Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्नेहा झोंडगे आत्महत्या प्रकरणात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यात आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातून आपण काहीच धडा घेतला नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं हे प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी २ मे २०२४ रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडील मंडळींनी कंपनी चालविण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावण्यात आला. पैशांसाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ, तसेच मारहाण केली होता. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने स्नेहाने पतीसह नातेवाईकांविरुद्ध यापूर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, सासरे संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ याने तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तक्रार मागे घेतल्यानंतरही स्नेहाचा छळ सुरू होता. राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारू, अशी धमकी तिला देण्यात आली होती. त्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचललं. आता आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पोस्ट केली आहे.

रोहित पवारांची पोस्ट काय?

पैशांसाठी वैष्णवी हगवणे या विवाहितेचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच माहेराहून २० लाख रुपये आणण्याच्या सासरच्या मागणीला कंटाळून पुण्यात आंबेगाव इथं स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद आणि वेदनादायी घटना घडली. या प्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटकही होईल पण यामुळं स्नेहाचा गेलेला जीव परत येणार आहे का? हा प्रश्न मनाला सतावतो. वैष्णवी हगवणे प्रकरणातून समाजाने कोणताही धडा घेतलेला दिसत नसल्याचंच यातून दिसून येतं. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात विवाहितेला जीव गमवावा लागत असेल तर या घटनेला कारणीभूत असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. स्नेहा झेंडगे हिला भावपूर्ण श्रद्धांजली!

स्नेहाला छळ असह्य झाल्याने तिने आयुष्य संपवलं

स्नेहाला तिचा छळ असह्य झाल्याने स्नेहाने शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.