काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला होता. यावेळी अजित पवार यांनी वयावरून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. ‘सरकारमधील कर्मचारी ५८ व्या वर्षीच निवृत्त होतात. पण, ८४ वय झालं तरी तुम्ही थांबेना,’ असं बोलत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होता. आता अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रोहित पवार म्हणाले, “आजपर्यंत शरद पवार सगळ्यांना मार्गदर्शन करत आले आहेत. आम्ही युवा बोलतो तेव्हा, ‘बच्चा’ म्हटलं जातं. आमच्या वयात शरद पवार देशातील तरूण मुख्यमंत्री झाले होते. पण, सगळ्या गोष्टी आणि पदे यांनाच ( अजित पवार ) मिळाली पाहिजेत. त्यामुळे या नेत्यांचं वय योग्य आणि बाकीच्यांचं अयोग्य, असं त्याचं मत आहे.”
“सोयीचं राजकारण आणि भाषणं केली जात आहेत”
“सत्ता आणि स्वहितासाठी हे नेते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेले आहेत. सत्ता आणि मंत्रीपदासाठी जे वय लागतं, ते या नेत्यांकडे आहे. सोयीचं राजकारण आणि भाषणं केली जात आहेत. या नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्य कसा आहे, हेच सांगण्यात यांचा वेळ जातो. कारण, कार्यकर्ते आणि जनतेला हा निर्णय पटलेला नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोडून गेलेल्यांना जनमत मिळताना दिसत नाही,” असंही रोहित पवारांनी म्हटलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
“जनतेच्या अडचणी सोडावणे आणि बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यात आपला कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं की, ‘पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो.’ याच शिकवणीतून आपण पुढं चाललो आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं होतं.
“आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे”
“वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही वर्षोनुवर्षे चालेली परंपरा आहे. पण, काहीजण ऐकण्यास तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारमधील कर्मचारी ५८ व्या वर्षीच निवृत्त होतात. काहीजण ६५, ७० आणि ७५ व्या वर्षी निवृत्त होतात. मात्र, ८४ वय झालं तरी तुम्ही थांबेना… अरे काय चाललंय काय… आम्ही आहोत ना काम करायला… कुठं चुकलो तर सांगाना… आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे. पाच ते सहावेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळलं आहे,” असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्र सोडलं होता.