महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एक वर्षापासून रखडला आहे. अशातच १० दिवसांपूर्वी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवार यांनी स्वतः उपमुख्यमंत्रिपदाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु अद्याप कोणत्याही मंत्र्याला खातं मिळालेलं नाही. खातेवाटपावरून सध्या केवळ चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भातील चर्चा आता दिल्लीत होईल असं बोललं जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भातील चर्चेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंगळवारी (११ जुलै) मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर तब्बल दीड तास चर्चा केली होती. सागर बंगल्यावर ही बैठक पार पडली. त्यानंतर आज (१२ जुलै) सकाळीदेखील यासंबंधी बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

हे ही वाचा >> “महिला आणि पुरुषांमध्ये फरक”, आदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्रीपद देण्याच्या चर्चांवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, अजित पवार यांना भाजपाच्या दिल्लीतल्या नेतृत्वापुढे फरफटत जावं लागतंय का? त्यावर रोहित पवार म्हणाले, ते कुठेही फरफटत जाणार नाहीत. योग्य वेळी ते त्यांची ताकद दाखवतीलच. फक्त ती ताकद दाखवताना आमच्याबरोबर राहून पुढच्या पाच वर्षांमध्ये ते महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करू शकले असते, याचा वेगळा आनंद आम्हा सर्वांना नक्कीच मिळाला असता.