scorecardresearch

“बागेश्वर बाबाने तुकोबांबद्दलचं वक्तव्य मागे घेतलं, आता मुंबईत बसलेल्या बाबाला…” रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम यांच्याबद्दलचं वक्तव्य मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शास्त्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.

rohit pawar dhirendra shastri bhagat singh koshyari
धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम यांच्याबद्दलचं वक्तव्य मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शास्त्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आपलं वक्तव्य मागे घेत माफी मागितली आहे. तुकारामांना त्यांची पत्नी मारहाण करायची म्हणून ते भक्तीमार्गाला लागले, अशी मुक्ताफळे धीरेंद्र शास्त्री यांनी उधळली होती. आता त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं आहे. दरम्यान, शास्त्रींनी त्यांचं वक्तव्य मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवरून धीरेंद्र शास्त्री आणि राज्यपालांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “बागेश्वर बाबाला उपरती झाल्याने त्याने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांबद्दलचं विधान मागे घेतलं…. पण मुंबईत समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या बाबाला परतीचे वेध लागले तरी उपरती होत नाही, हे दुर्दैव आहे!” मुंबईत राज्यपालांचा बंगला मलबार हिल येथे समुद्र किनाऱ्यावर आहे. त्यामुळे रोहित पवारांनी नाव न घेता राज्यपालांना टोला लगावला आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपालांकडून नागरिकांच्या रोषाचा सामना

महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यार सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांना अनेकदा विरोधी पक्षांसह महाराष्ट्रातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाबद्दल राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. तसेच मुंबईतल्या मराठी माणसांबद्दलदेखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून मुंबईकरांचा रोष ओढवून घेतला होता.

हे ही वाचा >> अर्थसंकल्पातील ‘सप्तर्षी’वरून रोहित पवारांचा मोदी सरकारला खोचक टोला; म्हणाले, “अजित पवारांनी…”

कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली पदमुक्त होण्याची इच्छा

दरम्यान, अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई भेटीवर आले असता राज्यपालांनी त्यांना आपल्याला या (राज्यपाल पदाच्या) जबाबदारीतून मुक्त करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, त्यामुळे ते सथ्या विरोधकांच्या टीकेचा सामना करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी देखील आज राज्यपालांना टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 15:32 IST
ताज्या बातम्या