नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहणारे शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बांगर हे नव्या वक्तव्यामुळे वादात अडकण्याची शक्यता आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शुक्रवारी (९ फेब्रुवारी) हिंगोली येथील एका प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला. बांगर यां विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. तसेच त्यांचे विरोधकही हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करून त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. संतोष बांगर विद्यार्थ्यांना म्हणाले, “तुमचे आई-वडील येत्या निवडणुकीत मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवू नका.” तसेच बांगर यांनी चिमुकल्या मुलांकडून ते त्यांच्या आई-वडिलांसमोर काय बोलणार? कोणाला मतदान करायला लावणार? याबाबतची घोकमपट्टी करून घेतली.

संतोष बांगर शाळेतल्या चिमुकल्यांना म्हणाले की, “तुमच्या आई-वडिलांना आमदार संतोष बांगरला मतदान करायला सांगा. नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका. तुम्ही जेवला नाहीत, त्यानंतर तुमच्या आई-वडिलांनी विचारलं की तू जेवत का नाहीस? तर त्यांना सांगा की तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा, मग मी जेवेन.” संतोष बांगर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काय सांगणार? कोणाला मतदान करायला सांगणार? या प्रश्नांच्या उत्तरांची विद्यार्थ्यांकडून घोकमपट्टी करून घेतली. संतोष बांगर चिमुकल्यांना हा अजब सल्ला देत असताना शाळेतील कर्मचारी, शिक्षिका आणि बांगर यांचे कार्यकर्ते हसत होते.

हे ही वाचा >> “मुख्यमंत्री कार्यालय गुंडांना सुरक्षित वाटते काय?”, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संतोष बांगर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीतले नेते त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी बांगर यांच्या या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे!