Rohit Pawar angry on Police for Arresting Nitin Deshmukh : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवन परिसरात हाणामारी झाली. गेल्या काही दिवसांपासून विधिमंडळात या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक खटके उडत होते, त्यानंतर गुरुवारी त्यांचे कार्यकर्ते थेट हाणामारीवर उतरले. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या विधान भवनाची प्रतिमा मलीन झाली आहे. दरम्यान, आमदार आव्हाड यांनी आरोप केला आहे की पडळकरांच्या पाच कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या एका सहकाऱ्याला मारहाण केली. मात्र, पोलिसांनी त्या पाच जणांना, ज्यांच्यावर मकोकासारख्या कठोर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत त्यांना मात्र सोडून दिलं आहे.

आपल्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी जितेंद्र आव्हाड गुरुवारी मध्यरात्री पोलीस सांगतील त्या ठाण्यांमध्ये जात होते. मात्र, पोलिसांकडून त्यांना पुरेशी माहिती मिळत नव्हती. त्यावेळी आमदार रोहित पवारही त्यांच्याबरोबर होते. पोलिसांकडून मिळणारी वागणूक पाहून आमदार पवारही संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी समाजमाध्यमांवर आपली व्यथा मांडली.

आमदार रोहित पवारांनी मांडली व्यथा

आमदार रोहित पवार म्हणाले, “आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधान भवनात गुंडानी हल्ला केल्यावर मकोकाचे आरोप असलेल्या गुंडांना अटक करायचे सोडून नितीन देशमुखलाच अटक केली. दोन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर मारहाण झाल्याने त्यांची विचारपूस करण्याच्या अनुषंगाने नितीन देशमुख यांच्या भेटीची आम्ही मागणी केली असता पोलिसांनी चार पाच वेगवेगळया पोलीस ठाण्यांच्या ३ ते ४ तास फेऱ्या मारायला लावत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच जितेंद्र आव्हाडांना हातवारे करत अपमानस्पद वागणूक दिली.”

“पोलीस प्रशासन कायद्याने कारवाई करणार असेल तर सहकार्यच राहते. परंतु, काही पोलीस राजकीय आदेशाने वागणार असतील तर काय? दाद कुणाकडे मागायची? राजकीय आदेशाने वागणारे पोलीस लोकप्रतिनिधींना देखील जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामान्यांनी पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा करायची की नाही?

रोहित पवार म्हणाले, ज्या आजींची जमीन हडपली गेली त्या आजीला, ज्ञानेश्वरी मुंडे, देशमुख कुटुंब, सूर्यवंशी कुटुंब यासारख्या असंख्य घटना आहेत जिथे सत्ताधारी लोकांवर आरोप आहेत, त्यांनी न्यायाची अपेक्षा करायची की नाही?