नवाब मलिक प्रकरणावरुन सत्ताधारी महायुतीत ऑल इज नॉट वेल असल्याची स्थिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक आपल्या बरोबर नकोत असं पत्रही अजित पवारांना लिहिलं आहे. अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने शिंदे गटाचीही कोंडी झाली आहे. अशात आता रोहित पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता ते स्वतःच्याच सहकाऱ्यांची बाजू घेताना कसे अडखळत आहेत हे म्हटलं आहे. रोहित पवारांची ही सूचक पोस्ट चर्चेत आहे.

काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी?

प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्टवक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वतःच्याच सहकाऱ्याची बाजू मांडताना अडखळत आहे, हे बघून अत्यंत वाईट वाटतं. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व आवडतं. स्वयंभू नेतृत्व त्यांना नको असतं म्हणूनच त्यांच्याकडून लोकनेते संपवले जातात. आता वैचारिक मतभेद असले तरी एक क्षमता असलेला लोकनेता भाजपच्या रणनीतीचा शिकार होत आहे, याचं दुःख सर्व सहकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही नक्कीच आहे!

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टी अजित पवार गट या दोन सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं. विशेष म्हणजे सभागृहात हे काहीही न घडता सभागृहाबाहेर हे सगळं घडून आलं. सकाळी सभागृहात एकत्र बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी संध्याकाळी अजित पवारांना पत्र पाठवून नवाब मलिकांबाबत नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र त्यांनी ट्विटरवरही पोस्ट केलं. त्यामुळे यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना आता त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाब मलिकांच्या समावेशावरून मतभेद!

देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना अजित पवार गटात सहभागी करून घेण्यावरून आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी रीतसर पत्र लिहून नवाब मलिकांच्या सरकारमधील समावेशाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, “आमच्या भावनांचा आपण विचार कराल”, अशा सूचक शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पत्राचा शेवट केला आहे. त्यामुळे यावरून तर्कवितर्कांना उधाण आलेलं असताना अजित पवारांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना नवाब मलिकांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचं सांगितलं आहे.