Rohit Pawar on Haryana Election Result: राजकीय जाणकार आणि एग्झिट पोल्सना बुचकळ्यात पाडत हरियाणा निवडणुकीत निकाल भाजपाच्या बाजूने लागले. भाजपाने ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तर ज्यांना सत्तेचे दावेदार समजले जात होते, त्या काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. महिन्याभराने होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या निकालाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र या निकालानंतर वेगळाच मुद्दा मांडला असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धोक्याचा इशारा दिला आहे.

२०१९ साली हरियाणा निवडणुकीत भाजपाला केवळ ४० जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी त्यांना ६ जागा कमी मिळाल्या होत्या. यासाठी भाजपाने जननायक जनता पक्षाशी (जेजेपी) युती केली आणि सत्ता स्थापन केली. जननायक जनता पक्षाचे १० आमदार निवडून आले होते. भाजपा ज्यांच्याबरोबर आघाडी किंवा युती करतो, कालांतराने त्यांनाच संपवतो, असा एक आरोप विरोधक करत असतात. योगायोगाने हरियाणा विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत असेच काहीसे चित्र दिसले.

हे वाचा >> गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार माध्यमांना माहिती देताना म्हणाले, “दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्षाला यावेळच्या निवडणुकीत शून्य जागा मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी महाराष्ट्र दौऱ्यात २०२९ ला भाजपाचा मुख्यमंत्री स्वबळावर येईल, असे जाहीर केले आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातही भाजपाचे मित्रपक्ष संपवले जातील, हे सिद्ध होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हरियाणाच्या निकालातून खूप काही शिकले पाहीजे.”

जननायक जनता पक्षाचे पानिपत

२०१९ साली किंगमेकर ठरलेला जेजेपी पक्षाला यावेळी शून्य जागा मिळाल्या आहेत. स्वतः पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री राहिलेले असतानाही त्यांचा यावेळी पराभव झाला आहे. २०१९ साली दुष्यंत चौटाला यांना कलान मतदारसंघातून ९२,५०४ मते मिळाली होती. यावेळी त्यांना केवळ ७,९५० मते मिळाली असून पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

हे ही वाचा >> महाविकास आघाडीला निकालातून सूचक इशारा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरियाणात भाजपाचा विजय झाला असला तरी त्यांनी २०१९ साली ज्यांच्यासह सत्ता स्थापन केली. त्यांचे नाव या वेळच्या निवडणुकीतून पुसले गेले असल्याची चर्चा आहे. यावर्षीच मार्च महिन्यात भाजपाने जेजेपीशी आपली युती तोडून टाकली होती. मनोहरलाल खट्टर यांना बाजूला करून नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवून अल्पमतातील सरकार चालविले. त्याचे फळ त्यांना निकालातून मिळाल्याचे बोलले जात आहे.