नगर : आदर्शगाव हिवरेबाजार हे शाश्वत ग्रामविकासाचे उत्तम उदाहरण तयार झाले आहे. रोजगार हमी योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद असून त्यातून गावांचा शाश्वत विकास होऊ शकतो. शाश्वत विकासासाठी आणि पाणलोट विकास कामासाठी सध्यातरी शासनाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतूनच गावातील विकासकामे करून आदर्शगावे निर्माण होऊ शकतात, राज्य सरकारच्या रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केला.

नंदकुमार यांनी आदर्शगाव हिवरेबाजारला काल, गुरुवारी भेट दिली. या वेळी विभागाचे सहसचिव  सुभाष गावडे, अतिरिक्त सचिव चंदनशिवे, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कृषी उपसंचालक सुरेश भालेराव आदी उपस्थित होते, त्या वेळी नंदकुमार बोलत होते.

गावातील विकासकामांची पाहणी नंदकुमार यांनी केली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी माहिती दिली. शेतकरी समृद्धीसाठी हिवरेबाजारच्या शेतकऱ्यांनी ज्या उपाययोजना राबवल्या त्यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केली व गेल्या ३० वर्षांत हिवरेबाजार गावाने विकासाचे टप्पे कसे पार केले याविषयी माहिती घेतली. आदर्शगाव योजनेत गावात  प्रगतिपथावर असलेल्या यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना दिल्या.

रोहयोमध्ये मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध असल्याने आदर्शगाव योजना व ‘मनरेगा’यांची सांगड घालून महाराष्ट्रील शेतकरी समृद्ध  होण्यासाठी विभागाचा प्रयत्न राहील असेही नंदकुमार यांनी सांगितले. गावाचा विकास सामुदायिक प्रयत्नांनी होत असतो, तोच प्रयत्न हिवरेबाजार गावाने केला. असाच प्रयत्न राज्यातील इतर गावांनी केल्यास गावे आदर्श होतील, असे आवाहन पवार यांनी केले.