आर्थिक दुष्टचक्रात सापडलेल्या वसमत येथील रोकडेश्वर सहकारी सूतगिरणीकडे एमएससी बँकेचे ३० कोटींचे कर्ज थकल्याने बँकेने अखेर या सूतगिरणीला सील ठोकले. परिणामी, ४०० कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
सूतगिरणीच्या २१ हजार १६८ चात्यांचा खडखडाट बिकट अर्थकारणामुळे बंद झाला. मागील युतीच्या काळात तत्कालीन सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी हा प्रकल्प उभारला होता. परंतु काम पूर्णत्वास जाण्यापूर्वीच प्रकल्पाला घरघर लागली आणि काम रखडले. प्रकल्पातील साहित्याची मोठय़ा प्रमाणात चोरी झाली. दरम्यान, पोलिसात गुन्हे दाखल झाले. परिणामी हा प्रकल्प परत उभा राहण्याची शक्यता नव्हती.
परंतु आघाडी सरकारमध्ये सहकार राज्यमंत्रिपदावर जयप्रकाश दांडेगावकर यांची वर्णी लागली. त्यांच्या प्रयत्नातून या सूतगिरणीला संजीवनी मिळाली. त्यामुळे प्रकल्प नव्या दमाने उभा ठाकला. दांडेगावकर यांच्या प्रयत्नातून २००७मध्ये २५ कोटींचे कर्ज एमएससी बँकेकडून घेतले होते. तसेच खेळते भांडवल असे एकूण ३० कोटी कर्जापोटी घेण्यात आले होते. २०११मध्ये सूतगिरणीने ६० हजार रुपयांनी गाठी खरेदी केल्या. चार महिन्यांनंतर ३० हजारांवर गाठी आल्या. त्यामुळे सूतगिरणीला सात कोटींचा फटका बसला. सूतगिरणी तोटय़ात जात असल्याने एमएससी बँकेच्या कर्जाची परतफेड करणे सूतगिरणीची डोकेदुखी बनली होती.
एमएससी बँकेने २०१२ला नोटीस बजावून पसे भरा नाहीतर सील ठोकण्यात येईल, असे बजावले. त्यामुळे संचालक मंडळाने ६ कोटी रुपये भरले होते. पसे भरण्याची हमी देण्यात आली. त्यामुळे बँकेची पुढील कार्यवाही थांबली होती. गेल्या २ डिसेंबरला बँकेने पुन्हा जप्तीची नोटीस दिली असता, ‘रोकडेश्वर’ने ३० लाख रुपये बँकेत भरले. आजअखेर १९ कोटींचे कर्ज, तसेच ११ कोटींचे व्याज असे एकूण ३० कोटी कर्जाचे ओझे ‘रोकडेश्वर’वर झाले होते. आजमितीला सूतगिरणीकडे ५०० क्विंटल कापूस असून, त्यापासून सूत तयार केल्यास तो ९० लाखांचा माल होतो.
एकूणच ‘रोकडेश्वर’ची स्थिती पाहता ३० कोटी रुपये भरणे रोकडेश्वरला अशक्य बाब होती. अखेर १७ डिसेंबरला बँकेचे नांदेड येथील प्राधिकृत अधिकारी पी. बी. कबटे यांचे पथक रोकडेश्वरला आले व त्यांनी जप्त कायद्यानुसार बँकेच्या थकीत कर्जापोटी रोकडेश्वरची सर्व मशिनरी, जमीन, मालमत्ता याचा पंचनामा करून ती ताब्यात घेतल्याची नोटीस लावून १४ ठिकाणी कुलूप ठोकले. विशेष म्हणजे बँकेचे अधिकारी रोकडेश्वरवर आले, त्या वेळी पहिल्या पाळीचे १२८ कर्मचारी कामावर होते व २१ हजार १६८ चाती पूर्ण क्षमतेने सुरू होती. कर्मचाऱ्यांना बाहेर काढून अधिकाऱ्यांनी सील ठोकले. प्रकल्पावर ४००च्या वर कामगार कार्यरत होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कार्यकारी संचालकांना रडू कोसळले
‘रोकडेश्वर’चे कार्यकारी संचालक दिलीप महाजन यांना सील ठोकण्याची प्रक्रिया चालू असताना रडू कोसळले. या कारखान्यावर ज्यांची उपजीविका होती, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सूतगिरणीवर कर्जाचा डोंगर आहे. मात्र, संचालक मंडळाने हप्ते पाडून बँकेचे कर्ज फेडण्याचे प्रयत्न केले. परंतु २०११मध्ये कापसाच्या गाठीत मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा फटका सूतगिरणीला बसला. बँकेचे कर्ज असतानाही प्रशासन व संचालक मंडळाने जििनगकडून गाठी उधारीत घेऊन त्याचे सूत तयार केले. हे सूत स्थानिक बाजारपेठेत, तसेच मालेगाव, धुळे, इचलकरंजी येथे विकण्यात आले. त्यातून आलेल्या पशातून वीजबिल व कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करण्यात आले, असे ते म्हणाले.
बँकेची २०१२मध्ये नोटीस आली होती. आतापर्यंत सूतगिरणीकडून १४ कोटी रुपये बँकेत कर्जाच्या व्याजापोटी भरले आहेत. त्यानंतर २ डिसेंबरला बँकेची जप्तीची नोटीस आल्यानंतर सूतगिरणीने ३० लाखांचा बँकेत कर्जापोटी भरणा केला. यावरून कर्जाची परतफेड करण्याचे काम चालू होते. दोन-तीन दिवसांपूर्वीच सूतगिरणीने ७ हजार ३०० किलो सूत उत्पादनाचा विक्रमी आकडा गाठला असताना रोकडेश्वरला सील ठोकले गेले, असे सांगताना महाजन यांना गहिवरून आले व अक्षरश: रडू कोसळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rokadeshwar sutgirni seal
First published on: 20-12-2014 at 01:57 IST