राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठं विधान केलं. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाष्य शरद पवारांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाष्य करत अनेक प्रादेशिक पक्षांचा प्रस्ताव असल्याची सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

“देश पातळीवर चर्चा चालू आहे. राहुल गांधी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांनी सांगितले की, अनेक पक्षांचा प्रस्ताव आहे. देशात भाजपाच्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात मूठ बांधावी आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहावं. अशा पद्धतीची भूमिका देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी मांडलेली आहे, असे मला राहुल गांधी सांगत होते”, असं नाना पटोले म्हणाले. याबरोबरच शरद पवार जे सांगत आहेत. त्यामध्ये तथ्य असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा : काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले…

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये सामावून घेण्यासंदर्भात काही अटी असतील का? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, “काही अटी नसतील. गांधी परिवाराच्या नेतृत्वाला मान्य करून चालतील. देशामध्ये सध्या जे परिवर्तनाचे वारे सुरु झालेले आहेत. त्या परिवर्तनाचे मूळ राहुल गांधी आहेत. महाराष्ट्रात या लोकसभेला जवळपास ४५ पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या येतील. तसेच देशात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार येईल”, असे नाना पटोल म्हणाले. ते टव्ही ९ शी बोलत होते.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे, असे त्यांना वाटत असेल”, असं शरद पवार मुलाखतीत बोलताना म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील” असे शरद पवार म्हणाले.