राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पश्चिम विभागीय संघचालक तथा जुन्या पिढीतली ज्येष्ठ वकील माणिकराव नरसिंगराव पाटील यांचे शुक्रवारी रात्री येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. शनिवारी दुपारी अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून माणिकराव पाटील यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आगरकर मळय़ातील (स्टेशन रोड) निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.
‘दादा’ या नावाने माणिकराव पाटील वर्तुळात परिचित होते. ते मूळ गुरवपिंप्री (तालुका कर्जत) येथील रहिवासी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खुद्द संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्याकडूनच त्यांनी संघ स्वयंसेवकाची प्रतिज्ञा घेतली होती. नगर येथे वकिली करतानाच सुरुवातीच्या काळात स्वयंसेवक, नंतर जिल्हा संघचालक, महाराष्ट्राचे प्रांत संघचालक, पश्चिम विभागाचे (महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात) संघचालक अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते गोळवलकर गुरुजींच्या अत्यंत निकट होते. कडक शिस्त आणि संघावर निस्सीम निष्ठा हे त्यांचे वैशिष्टय़ होते. राजबिंडे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या माणिकरावांचा संघ परिवारात आदरयुक्त दरारा होता. हेडगेवार यांच्यानंतर गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, के. सुदर्शन व विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत अशा सर्वच सरसंघचालकांच्या समवेत त्यांनी कार्य केले. जीवनातील उणीपुरी सत्तर वर्षे त्यांनी संघकार्यात व्यतीत केली. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. नाशिक जिल्हय़ातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेते काकासाहेब वाघ यांचे ते जावई व सहकारातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे थोरले साडू होते.
शनिवारी सकाळी आगरकर मळय़ातील निवासस्थानापासून सकाळी १० वाजता सजवलेल्या मालमोटारीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरी घुमटावरील (आनंदीबाजार) केशवार्पण या कार्यालयात काही वेळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss senior volunteer manikrao patil passed away
First published on: 07-09-2014 at 03:50 IST