Rummy Viral Video Of Manikrao Kokate: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा गेल्या आठवड्यात समारोप झाला. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे कथितपणे अधिवेशन कालावधीत सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच विरोधी पक्षांसह राज्यातील विविध संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले आहे.
माणिकराव कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्याची पडताळणी झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.”
या सर्व वादात काल माणिकराव कोकाटेंनी “शेतकरी भिकारी नाही, सरकार भिकारी आहे”, असे विधानही केले होते. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मला वाटते मंत्रीमहोदयांनी असे बोलू नये, ते असे बोलले असतील तर बोलू नये.”
दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासून सतत या ना त्या कारणाने वादात सापडत आहेत. आता रमीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. महायुती सरकार त्यांचा राजीनामा घेणार का? असाही प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, “त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. मला वाटते ते जे काही बोलले, त्याची वस्तुस्थिती काय आहे, हे पाहून अजित पवार निर्णय घेतील.”
काय आहे रमी प्रकरण?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत कथितपणे मोबाईलवर रमीचा गेम खेळत होते. त्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला होता. त्यानंतर या प्रकरणी राजकीय वाद निर्माण झाला आहे.
व्हिडिओ शेअर करताना रोहित पवार म्हणाले होते की, “अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला विचारल्याशिवाय काहीही करू शकत नाही. म्हणूनच, जेव्हा महाराष्ट्रात शेतीशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि दररोज आठ शेतकरी आपले प्राण गमावत आहेत, तेव्हा असे दिसते की कृषीमंत्र्यांकडे काम नाही आणि त्यामुळे ते रमी खेळण्यात वेळ घालवत आहेत.”