शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. संभाजी भिडेंच्या वक्तव्याची आता राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही, हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे. राज्याचे गृहमंत्री यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी ट्वीटरवरून शेअर केला आहे.

हेही वाचा- मनुस्मृतीचा उल्लेख करत अमोल मिटकरींचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल; म्हणाले, “मनु संपला असं वाटत होतं, पण…”

रुपाली चाकणकर ट्विटमध्ये म्हणाल्या, “राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले तसेच लाखोंचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल मनोहर भिडे यांनी केलेली वक्तव्य निंदनीय, निषेधार्ह आणि संतापजनक आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपित्याचा अवमान करणे, तसेच त्यांच्या मातोश्रींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत जाहीरपणे आक्षेपार्ह भाष्य करणं, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.”

हेही वाचा- “मनोहर कुलकर्णीचा वेळीच बंदोबस्त केला असता तर…”, प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मनोहर भिडेंवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असं म्हणत भिडे पळवाट शोधतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे चुकीचं आहे. महात्मा गांधींचा देश हीच भारताची जगभरातील ओळख आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही, हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे.राज्याचे गृहमंत्री यांनी तातडीने कारवाई करावी”, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली.