सातारा : रोहित पवारांची मला कीव येते. रावणाला राम म्हणायचे काम ते करत आहेत. नाव राम असले म्हणजे कुणी प्रभू श्रीराम होत नाही. ज्यांचे नाव राम आहे त्यांनी आजपर्यंत शकुनी मामाचीच कामे केली आहेत. रोहित पवार त्यांची वकिली का करत आहेत. सत्तेच्या विरोधात संघर्ष करूनच आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत, त्यामुळे सत्तेचे शहाणपण पवारांनी आम्हाला शिकवू नये. लवकरच आणखी काही घडामोडी घडतील आणि आज जे उन्हात आहेत ते लवकरच मांडवाखाली येतील, असा इशारा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणीप्रकरणी माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज पोलिसांनी चौकशी करताच आ. रोहित पवार यांनी एक ट्वीट केले होते. गोरे सत्तेचा गैरवापर करून रामराजेंना त्रास देत असल्याचे पवार म्हणाले होते. सत्ता येते आणि जाते; त्यामुळे गोरेंनी विचार करावा, असा इशाराही रोहित पवारांनी दिला होता.
यावर गोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘राम नाव असले, तरी कामे शकुनीसारख्या करणाऱ्या रामराजेंची बाजू घेणाऱ्या रोहित पवारांची कीव येते. तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहे. आम्ही त्यात कधीही हस्तक्षेप करत नाही. जे तपासात समोर आले आहे, त्याची चौकशी केली जात आहे. ज्यांची चौकशी होतेय त्यांनी स्पष्टीकरण करावे. मी काही केले नाही, माझा आवाज नाही, माझे नाव नाही, माझा सहभाग नाही, हे रामराजेंनी सांगावे. रोहित पवार त्यांची वकिली कशासाठी करत आहेत. त्यांनी त्यांचे पाहावे. सत्ता आणि संघर्षाबाबत त्यांनी मला शिकवू नये. सत्तेच्या विरोधात संघर्ष करूनच आम्ही उभे राहिलो आहे.
आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या षड्यंत्रात बळी पडून आम्ही खूप दुःख सोसलेय. संघर्षाच्या छाताडावर उभे राहून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. त्यामुळे सत्तेचे आणि संघर्षाचे शहाणपण त्यांनी आम्हाला शिकवू नये. पवारांनी फार सोज्वळ गप्पा मारू नयेत. आम्हाला धमक्या तर अजिबात देऊ नयेत. कोणी कुणाला कॉल केले, कोणी कॉल करायला सांगितले हे तपासात समोर आले आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी दोषी असणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे आणि लवकरच त्यातील सत्य बाहेर येईल, असेही गोरे म्हणाले.
जयकुमार गोरेंकडून दहशत – रोहित पवार
जयकुमार गोरे हे त्यांना मिळालेल्या पदाचा उपयोग दहशत आणि दडपशाहीसाठी करत आहेत. त्यांच्यावर झालेले आरोप आणि सत्य परिस्थिती लोकांना माहीत आहे. त्यांच्या दहशतीला आणि दडपशाहीला जे बळी पडलेले आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. मंत्री असतानाही राज्याच्या प्रश्नात लक्ष न घालता जिल्ह्यात बसून दहशत निर्माण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला.