उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उद्योगपतीकडून पैसे उकळण्यासाठी हा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. याचसोबत, वाहनाचे मूळ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा देखील कट वाझेनेच रचला होता असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर वाझेने ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलातील एक खोली वेगळ्या नावाने तब्बल १०० दिवस आरक्षित केली होती, अशी देखील माहिती एनआयएने आपल्या आरोपपत्रात दिली आहे.

एनआयएने आरोपपत्रात असं म्हटलं आहे की, “हा कट रचण्यामागे उद्योगपतीला घाबरवण्याचा आणि गंभीर परिणामांची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा स्पष्ट हेतू होता. या कटामध्ये माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह पाच सेवेतील आणि निवृत्त पोलिसांचा कथित सहभाग होता. एनआयएचे म्हणणं आहे की, त्यांनी ह्यात इतर पाच जणांचा सामील करून घेण्यात आलं होतं. तर, त्यापैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे.”

प्रदीप शर्मांना देण्यात आली होती मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी; सचिन वाझेने दिली होती नोटांनी भरलेली बॅग

दिशाभूल करण्यासाठी ‘तो’ मेसेज

एनआयएने असंही म्हटलं आहे की, अंबानी कुटुंबाला धमकी देण्यासाठी वाझे याने वाहनात एक चिठ्ठी ठेवली होती. तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी टेलीग्राम या अ‍ॅपवर एक मेसेज पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये कथितरित्या जैश-उल-हिंद ही दहशतवादी संघटना स्फोटकं लपवण्याची जबाबदारी घेत असल्याचं भासवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे एनआयएचं असं स्पष्ट म्हणणं आहे की, “वाझे यानेच संबंधित वाहनाचे मूळ मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचा कट रचला होता.”

“अंबानी कुटुंबीयांकडून पैशांची मागणी करत टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या धमकीमधून आर्थिक लाभ मिळवण्याचा वाझे याचा हेतू स्पष्टपणे दिसतो आहे. वाझे याने स्वतः हे स्फोटकांनी भरलेलं वाहन चालवलं आणि अंबानींच्या बंगल्याजवळ उभं केलं. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या पोलीस वाहन चालकाला या कटाबाबत कोणतीही कल्पना नव्हती. त्यांना हे एक गुप्त ऑपरेशन असल्याचं सांगण्यात आलं होतं”, असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

घटनास्थळी पोहोचणारा पहिला व्यक्ती

“पुढे हा प्रकार समोर आल्यानंतर सचिन वाझे हाच घटनास्थळी पोहोचणारा पहिला व्यक्ती होता. यावेळी त्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतःकडे हस्तांतरित केला. जेणेकरून अंबानी कुटुंब आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याच्या सुनियोजित षडयंत्राचा भाग म्हणून त्याला या संपूर्ण प्रकरणाची मोडतोड करणं सहज शक्य होईल”, असं देखील या आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यातच दुसऱ्या दिवशी जेव्हा वाझे याच्यासोबत गेलेल्या पोलीस वाहन चालकाने ही बातमी पाहिली तेव्हा त्याला धक्काच बसला. परंतु, वाझेने त्यालाही याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिल्याचे एनआयएने म्हटलं आहे.

सचिन वाझेला पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून वाढवायचा होता आपला दबदबा – NIA

१०० रात्रींसाठी ओबेरॉयमध्ये खोली बुक

एनआयएने आरोपपत्रात पुढे असं म्हटलं आहे की, सचिन वाझे याने स्वतःचे आणि त्याच्या साथीदारांचे हे सर्व उद्योग लपवण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात ठेवलेलं व्हिझिटर्स रजिस्टर देखील नष्ट केलं होतं. इतकंच नव्हे तर याच षडयंत्राचा एक भाग म्हणून पंचतारांकित हॉटेल ओबेरॉयमध्ये सुशांत खामकर या नावे सचिन वाझेने १०० रात्रींसाठी एक खोली बुक केली होती. त्याला वाटलं की, आपल्या या षडयंत्राचं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी ही एक सुरक्षित जागा आहे.

…म्हणून रचला मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट

सचिन वाझे याच्याच सूचनेनुसार मनसुख हिरेन यांनी १७ फेब्रुवारी रोजी विक्रोळी पोलिसांत आपली स्कॉर्पिओ चोरीला गेल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता. वाझेने स्वतः ती कार चालवली होती आणि आपल्या ठाण्यातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये ती आणली होती. मात्र, त्यानंतर मनसुख हिरेन यांनी एका मर्यादेपलीकडे या षडयंत्राचा भाग होण्यास नकार दिला. ज्यामुळे वाझे आणि त्याच्या साथीदारांनी हिरेन यांना संपवण्याचा कट रचला.

एनआयएने सांगितलं की, पोलीस आयुक्त कार्यालयात २ आणि ३ मार्च रोजी दोन बैठका घेण्यात आल्या होत्या. ज्यात पोलीस निरीक्षक सुनील माने आणि माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा उपस्थित होते. यावेळी, वाझेने मनसुख हिरेन समोर येतील याची खात्री केली. जेणेकरून, हिरेन यांची ओळख होऊ शकेल. या आरोपपत्रात पुढे मनसुख हिरेन यांच्या हत्येचं देखील संपूर्ण तपशीलवार माहिती नमूद करण्यात आली आहे.