रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. मागील काही दिवसांपासून ईडीने महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर केलेल्या कारवाईच्या संदर्भातून बोलताना खोत यांनी, “येड्यांच्या मागं लागली ईडी अशी परिस्थिती या राज्यात झालेली आहे. ज्यांना शहाणपणा आहे. जे सज्जन आहेत त्यांना काय येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करायची गरज नाही. पण हे येडे आहेत म्हणून ही ईडी त्यांच्यावर आहे,” असं म्हटलंय.

आम्ही सध्या रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरा सुरु केला असल्याचंही खोत यांनी यावेळी सांगितलं. वीज बिलाच्या प्रश्नासंदर्भात आपण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जागृती आणू, असं खोत म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धमकी वजा इशाराही दिलाय, “वीज कनेक्शन कापायला आलात तर शेतकऱ्यांच्या हाती दांडके असतील. आणि तुम्हाला सोलून काढलं जाईल. तुम्हाला १०० टक्के वीज माफी द्यावी लागेल,” असं खोत यांनी म्हटलंय. “हे सरकार लुटारुंचं आहे.त्यांना वसुलीशिवाय दुसरं काहीच येत नाही. सकाळ संध्याकाळ फक्त वसुली करायची बाकी काही डोक्यात नाही,” असा टोलाही त्यांनी लगावलाय.

शिवसेनेतले गजाजन किर्तीकर, रायगडचे माजी खासदार अनंत गिते या सगळ्यांनी महाविकास आघाडीसंदर्भात केलेल्या वक्तव्यांचा दाखलाही यावेळेस खोत यांनी दिलाय. “संजय जाधव यांनी म्हटलंय की सहनशीलतेच्या आम्ही पुढे गेलो आहोत आम्ही कधीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू शकतो. अनंत गिते म्हणालेत की शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाही. महाविकास आघाडी ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे.
गजाजन किर्तीकर आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार लाभ कोण घेतंय तर पवार सरकार. आता जे तान्हाजी सावंत जे बोलले ते त्यांच्या मनातील खदखद होती. ६० टक्के निधी राष्ट्रवादीला, ३० टक्के काँग्रेसला १५ टक्के शिवसेनला नेमकी सत्ता या राज्यात कुणाची आहे. हा प्रश्न शिवसैनिकालाही पडलाय,” अशी टीका खोत यांनी केलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रवादीचा पंचायत समितीचा, जिल्हा परिषदेचे सदस्य पाच पाच कोटी निधी आणतोय दुसरीकडे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असला तरी तो झुणका भाकर केंद्र, शिवभोजन थाळी चालवायला मिळावी म्हणून मुंबईला हेलपाटे घालतोय. ही परिस्थिती एकंदरित आज शिवसेनेची राज्यात झालेली आहे,” असा टोला खोत यांनी लागवला आहे. “पवारांच्या जवळ गेले आणि जाता जाता पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा नाही कळले,” अशी शिवसेनेची अवस्था झाल्याचा टोला खोत यांनी लगावलाय.