राहाता : सन १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारणारे अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचारासाठी मोठा खर्च असल्याची माहिती शिर्डीतील नागरिकांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ५ लाखांची रोख रक्कम पाठवून मदतीचा हात दिला आहे. साईंच्या नगरीनेच साईबाबांची भूमिका करणारे अभिनेते सुधीर दळवी यांना मदतीचा हात दिल्याने माणुसकीच्या भावनेचा प्रत्यय आला.
साईबाबांची महती जगभर पसरवणारे, साईभक्त तथा ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या उपचारासाठी दळवी कुटुंबीयांनी चाहत्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्याला साथ देत शिर्डी ग्रामस्थांनी ५ लाख रुपयांची मदत दिली. तसेच साई संस्थानचे कर्मचाऱी आपला अर्धा दिवसाचा पगार अभिनेते दळवी यांना मदत म्हणून देणार आहेत.
यासंदर्भात काल, गुरुवारी रात्री शिर्डीत ग्रामस्थांची बैठक झाली. प्रमोद गोंदकर यांनी समाज माध्यमावर साईंच्या रुपातील सुधीर दळवींना मदतीचे आवाहन करताच, ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. यंदाच्या श्रीरामनवमी उत्सवाच्या लोकवर्गणीतील साडेचार लाख रुपये शिल्लक होते. त्यात अजून ५० हजार रुपये जमा करून ग्रामस्थांनी अभिनेते सुधीर दळवी यांना मदत केली. त्याचबरोबर साईबाबा संस्थानचे कर्मचारीही आपल्या अर्ध्या दिवसाचा पगार मदत म्हणून देणार आहेत. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी ही माहिती दिली.
ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. दळवी यांना विखे परिवाराच्या वतीने वैयक्तिकरित्या एक ते दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
दळवींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना
अभिनेते सुधीर दळवी यांनी साईबाबांची भूमिका साकारून जगभर साईबाबांची महती पोहोचवली. त्यांच्या अभिनयामुळे शिर्डीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले. आता त्यांच्यावर उपचार सुरू असताना शिर्डीकरांनी आपल्या साईभक्त अभिनेत्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही शिर्डीच्या भक्तीची खरी परंपरा आहे. सुधीर दळवी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईभक्तांनी साईबाबांकडे प्रार्थना केली आहे. – कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी
