अहिल्यानगरःशेवगावमधील गुंतवणूकदारांना १ कोटी ६१ लाख रुपयांचा गंडा घालणारा साईनाथ कल्याण कवडे (२८, रा. कुरुडगाव, शेवगाव) याला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत (गुजरात) येथून ताब्यात घेतले. त्याची महेंद्रा कंपनीची मोटर जप्त करण्यात आली आहे.

यासंदर्भात अवधूत विनायक केदार (रा. खंडोबानगर, शेवगाव) यांनी शेवगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार साईनाथ कवडे याने त्याच्या ॲसिटेक सोल्युशन ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवले.  त्यामुळे अवधूत केदार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य व परिसरातील इतर पाच जणांनी कंपनीमध्ये १ कोटी ६१ लाख ४२ हजार ९०० रुपये गुंतवले.

परंतु गुंतवणुकीवरील रकमेचा परतावा न देता कवडे हा पसार झाला. तो सातत्याने ठिकाण व मोबाईल बदलत असल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार संतोष लोंढे, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड, ज्योती शिंदे यांच्या पथकावर कवडे याला अटक करण्याची जबाबदारी सोपवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साईनाथ कवडे हा सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सुरतमध्ये जाऊन त्याला अटक केली. तपासात साईनाथ कवडेने त्याच्या मालकीची १५ लाख रुपये किमतीची महिंद्रा मोटार (एमएच १६ सीवाय ०२२२) किशोर शिवाजी जाधव (रा. तिसगाव, पाथर्डी) याला दिल्याची माहिती दिली. ही मोटर पोलिसांनी जप्त केली. साईनाथ कवडेला पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. साईनाथ कवडे गेल्या सहा-सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.