राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक लवकरच होणार असून त्यामध्ये आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या अपक्ष उमेदवारीसाठी शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात इतरही पक्षांना त्यांनी विनंती केली असताना शिवसेनेकडून मात्र सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल अशी भूमिका घेतलेली असताना आता कोल्हापूरचे संजय पवार यांचं नाव या उमेदवारीसाठी चर्चेत आलं आहे. त्यासंदर्भात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती हे शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवणार असतील तर त्यांचा विचार होईल, असं राऊतांनी म्हटल्यानंतर खुद्द संभाजीराजेंनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारीची ऑफर दिल्याची देखील चर्चा सुरू झालेली असताना अचानक संजय पवार यांचं नाव चर्चेत आल्यामुळे संभाजीराजेंच्या उमेदवारीचं काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यासंदर्भात संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर बोलणं झाल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय ठरलंय?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं, ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकं या दोघांमध्ये काय ठरलंय, यावर चर्चा सुरू झाली आहे.

राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.

आकडेमोड काय सांगते…

राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.