काही दिवसांपूर्वी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. याठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेदरम्यान अनेक घरांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेनंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या ‘चलो विशाळगड’ या अभियानावर काही राजकीय नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान, याबाबतच आता संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे. रायगडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

“विशाळगडवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झालं होतं. हा किल्ला का महत्त्वाचा आहे? कारण ज्यावेळी पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा वेढा पडला, त्यावेळी महाराजांना मावळ्यांबरोबर जर कोणी संरक्षण दिलं असेल तर ते विशाळगडाने दिलं होतं. त्यामुळे या गडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा किल्ल्यावर अतिक्रमण झालं होतं, ते काढण्याचा माझा प्रयत्न होता. तिथे ज्यांनी अतिक्रमण केलं होतं. ते हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्माचे लोक होते. पण मी तिथे पोहोचायच्या आधीच बऱ्याच उलटसुलट गोष्टी घडल्या होत्या. पण माझा काहीही संबंध नसताना राजकीय लोकांनी मला लक्ष केलं”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “राजकीय नेत्यांनी मला जबाबदार धरल्यानंतर त्याचं मला खूप वाईट वाटलं. ज्या घराण्यात माझा जन्म झाला आहे, त्याच घराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. मात्र, तरीही सगळ्यांनी माझ्यावर संशय घेतला. त्यानंतर आठ-दहा दिवस मला झोपही लागली नव्हती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी तिसऱ्या आघाडीबाबतही भाष्य केलं. “सध्या ज्याप्रकारचं राजकारण सुरू आहे, त्याला राज्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळेच आम्ही सुसंस्कृतपर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की मतदारदेखील आम्हाला साथ देतील आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करतील. तिसऱ्या आघाडीच्या जागा वाटपाबाबत आम्ही सर्व नेते बसून निश्चित चर्चा करू. संपूर्ण २८८ जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असे ते म्हणाले.