शिवसेना आणि भाजपा यांचं विळ्या-भोपळ्याचं राजकीय नातं गेल्या दीड-दोन वर्षांत आख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्याआधीही सत्तेत एकत्र असताना धुसफूस सुरूच होती. मात्र, विरोधात आल्यानंतर ते अधिक तीव्र झालं. यातून सातत्याने दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. आत्तापर्यंत भाजपाकडून मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रसंग आले. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनाच लाच प्रकरणात एसीबीनं थेट पालिकेत दिवसाढवळ्या अटक केल्यानंतर शिवसेनेनं भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या अग्रलेखामधून भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.
नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे नाकच..
स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयातच एसीबीनं धाड टाकल्यावरून शिवसेनेनं भाजपावर परखड टीका केली आहे. “बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. एखाद्या महानगरपालिकेत अशा प्रकारचे धाडसत्र प्रथमच झाले असेल. नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे त्यामुळे नाकच कापले गेले”, असं या अग्रलेखातून शिवसेनेनं सुनावलं आहे.
एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय, ते…
दरम्यान, पिंपरी चिंचवड पालिकेत घडलेल्या प्रकारामुळे शहराची ‘इज्जत’ गेल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. “भाजपाची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी झाली आहे. या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमावण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे कधीच वावडे नव्हते. हेच लोक ऊठसूट मुंबई पालिकेवर निशाणा साधीत असतात. पण स्वत:च्या खुर्चीखाली काय जळतंय त्याचा मात्र त्यांना विसर पडतो. एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय, ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत घडले”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली – चंद्रकांत पाटील
…म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलणे!
दरम्यान, एसीबीच्या कारवाईनंतर भाजपाकडून याला षडयंत्र म्हणत आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावरून देखील शिवसेनेनं निशाणा साधला आहे. “सगळ्यांच्या डोळ्यांदेखत स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या एजंटला लाच स्वीकारताना पकडले यला भाजपावाल्यांनी षडयंत्र म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलण्यासारखं आहे. इतरांनी असे पैसे घेतले तर तो भ्रष्टाचार आणि स्वत:चे बरबटलेले हात पोलिसांच्या बेड्यांत अडकले, तर तो मात्र षडयंत्राचा प्रकार! पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमधील विद्यमान कारभाराविषयी सांगण्यासारखे खूप आहे. पण या महान शहरांची इज्जत जाईल, म्हणून पूर्णविराम देतो”, असं अग्रलेखात नमूद केलं आहे.