देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पुढील २५ वर्षे हा देशाचा अमृत काळ असल्याचं नमूद केलं. मात्र, याचवेळी १४ ऑगस्ट हा देशाचा फाळणी वेदना स्मृतीदिन म्हणून पाळण्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ साली झालेल्या देशाच्या फाळणीच्या आठवणी ताज्या झाल्या. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या मुद्द्यावरून निशाणा साधण्यात आला आहे. “दोन्ही देशांमधली दुभंगलेली मनं दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला बस घेऊन गेले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. ही वेदना संपावी हे मोदींच्याही मनात होतेच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली”, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यमान सत्ताधारी कृती करणार काय?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून शिवसेनेनं फाळणी वेदना स्मृतीदिनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कानपिचक्या दिल्या आहेत. “फाळणीच्या वेदनेचा दाह फक्त उक्तीने शमणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती देखील करावी लागेल. विद्यमान सत्ताधारी ती कृती करणार आहेत काय? देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो. पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते. ही आग कशी विझवणार?” असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी काँग्रेसनं सांगितली देशापुढची ८ आव्हानं!

फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की…

दरम्यान, शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि केंद्र सरकारला चिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. “फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस निवडला. हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या, की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा, यावर चिंतन झाले असते तर बरे झाले असते”, अशा शब्दांत मोदींना सल्ला देण्यात आला आहे.

हा तर पुन्हा फाळणीचा प्रयत्न; पटोले यांचा आरोप

फळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता..

दरम्यान, अखंड हिंदुस्थान हाच फाळणीच्या वेदनेवर उतारा होता, असं देखील या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. “फाळणीवर उतारा म्हणून भाजपाने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला. अखंड हिंदुस्थानचा गजर केला. फाळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता. पण फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचं राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधी करू शकल्या. इंदिरा गाधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजं रोवली जाऊ नयेत, हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे”, असं देखील यात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samna editorial today shivsena slams pm narendra modi on partition horrors remembrance day pmw
First published on: 16-08-2021 at 07:44 IST