संगमनेर : दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही, म्हणून अल्पवयीन तरुणाने एका व्यक्तीच्या डोक्यावर विटांचे प्रहार करत त्याला गंभीर जखमी केले. जखमीवर संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. या घटनेला कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, मात्र त्याच दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाल्याने घडलेला नेमका प्रकार समोर आला.
जखमी झालेले संगमनेरमधील आहेत. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास परदेशपुरा येथील देशी दारूच्या दुकानासमोर ही घटना घडली. तेथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले. संबंधित व्यक्ती कशाने जखमी झाली याची चौकशी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र प्रत्यक्षदर्शी कोणीही साक्षीदार आढळून आला नाही. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले आणि आरोपीचा शोध सुरू केला. ज्या दारूच्या दुकानासमोर ही घटना घडली, त्या दारूच्या दुकानातील सीसीटीव्हीमधील चित्रण पोलिसांनी तपासले असता घडलेला नेमका प्रकार समोर आला.
एक व्यक्ती संबंधित जखमीच्या डोक्यात वारंवार टणक वस्तूने प्रहार करत असल्याचे चित्रणातून समोर आले. संबंधित व्यक्ती अल्पवयीन असून यापूर्वीही त्याने अनेक समाजविघातक कृत्य केली असल्याने पोलिसांना त्याची ओळख पटली. लगोलग पोलिसांनी आरोपीचे घर गाठत मद्यधुंद अवस्थेतील आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आल्यानंतर चौकशी केली असता दारू पिण्यासाठी मी त्याला पन्नास रुपये मागितले, परंतु त्यांनी दिले नाही. उलट मला दोन-तीनदा कानाखाली मारली. त्यामुळे आपला राग अनावर झाल्याने आपण त्यांना मारहाण केली, अशी कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अजित कुऱ्हे यांनी स्वतः याबाबतची फिर्याद दिली आहे.
संगमनेर : दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही, म्हणून अल्पवयीन तरुणाने एका व्यक्तीच्या डोक्यावर विटांचे प्रहार करत त्याला गंभीर जखमी केले. जखमीवर संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची… pic.twitter.com/foF8ak7Lpg
— LoksattaLive (@LoksattaLive) August 7, 2025
हाणामारीचे प्रकार वाढले
अलीकडच्या काळात संगमनेर शहरामध्ये बेकायदा व्यवसाय तसेच व्यसनी व्यक्तींच्यात वाद, मारामाऱ्या होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषतः तरुण वर्ग व्यसनांच्या आहारी गेल्याचे वारंवार समोर आले आहे.