संगमनेर : अनेक वर्षे दुर्लक्षित जलसंपदा विभागाच्या घुलेवाडी येथील कार्यालयाची आता नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. कार्यालय, वसाहतीच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून, जागेची पाहणी जलसंपदा तथा पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. या वेळी मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.
घुलेवाडी येथे जलसपंदाचे कार्यालय अनेक वर्षे कार्यरत आहे. जुन्या इमारती, अपुऱ्या सुविधा, अनेक प्रकल्पांचे विभाग एकाच ठिकाणी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री विखे यांनी पुढाकार घेतला. जागेची पाहणी करताना त्यांच्यासमवेत आमदार अमोल खताळ, भाजपचे श्रीराम गणपुले, पायल ताजणे, श्रीकांत गोमासे, गुलाब भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कपिल पवार, शिवसेनेचे विठ्ठल घोरपडे, राम राहाणे, डाॅ. अशोक इथापे, आबासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
कार्यालयांचे नूतनीकरण करतानाच अत्याधुनिक शेतकरी प्रशिक्षण केंद्र विकसित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. प्रामुख्याने बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्याच्या व्यवस्थेचे मुख्य केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. संगमनेर वकील संघाने या परिसरात त्यांच्या संस्थेसाठी जागेची मागणी मंत्री विखे यांच्याकडे केली आहे. या भेटीत त्यांनी वकील संघाच्या सदस्यांची बैठक घेऊन विकसित प्रकल्पाची माहिती दिली. न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा दिली, त्याप्रमाणे वकील संघालाही सहकार्य करण्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली. या वेळी त्यांनी संगमनेर शहरात आमदार खताळ यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.