सांगली : गेली चार दशके वंचित असलेल्या जिल्ह्यातील ३५० चांदोली धरणग्रस्त खातेदारांना प्रत्येकी १ लाख ८५ हजार रुपये निर्वाह भत्ता जलसंपदा विभागाने मंजूर केला आहे. माजी जलसंपदा मंत्री आ. जयंत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर झाला असून, याबद्दल धरणग्रस्तांच्यावतीने आ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
धरणग्रस्तांचे कार्यकर्ते राम सावंत म्हणाले, की ज्यांच्या जमिनी चांदोली धरणात गेल्या आहेत, त्या धरणग्रस्त खातेदारांना महिन्याला रुपये ४०० प्रमाणे निर्वाह भत्ता मिळायला हवा होता. मात्र, १९ वसाहतीमधील ३५० खातेदार तब्बल ३९ वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित होते. आम्ही त्यासाठी सातत्याने मागणी आणि संघर्ष करीत होतो. आ. पाटील यांनी या प्रश्नास गती देऊन पाठपुरावा केल्याने हा निर्वाह भत्ता मंजूर झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यातील ३५० खातेदारांना सध्या निर्वाह भत्त्याचे वाटप सुरू आहे. आमचा जिव्हाळ्याचा एक प्रश्न मार्गी लागला आहे.
याप्रसंगी दिलीप पाटील तुंग, मारुती रेवले आष्टा (पेटलोंड), किरण पाटील, मुबारक कावनकर, महादेव पाटील, शंकर लोखंडे कसबे डिग्रज, लक्ष्मण सावंत आष्टा (लोटीव), प्रकाश सावंत, तानाजी पाटील बोरगाव, रामचंद्र सोनावणे बोरगाव, भाऊ जाधव साखराळे, लक्ष्मण पाटील निनाईनगर, शंकर सावंत कवठेपिरान यांच्यासह शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते.