सांगली : सांगली विधानसभा मतदार संघातील अनेक गावातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे बागायती शेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तरी या महामार्गाचा फेरविचार करावा, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली आहे.

आ. गाडगीळ यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन देत सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आमदार गाडगीळ यांच्या या मागणीचे पत्र (निवेदन) सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावित करावे असे निर्देश दिले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले.

हेही वाचा : “छगन भुजबळ व्हाया सुरत, गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत, त्यांना…” ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया!

आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे, सांगली विधानसभा मतदार संघातील अनेक गावातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील मौजे पदमाळे, कवलापूर, बिसूर, सांगलीवाडी, बुधगाव, खोतवाडी, कवलापूर इत्यादी गावातून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गात जाणाऱ्या या गावातील सर्व जमीन बागायती आणि पिकाऊ आहे. त्यामुळे या महामार्गामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकरी अल्पभूधारक किंवा भूमिहीन होण्याचाही धोका आहे. प्रस्तावित महामार्गाच्या उंचीमुळे या गावांना महापुराचा फटका बसण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा : सांगली: मृत्यूनंतर दहा जणांना दिले नवे आयुष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व गावातील शेतकऱ्यांमध्ये या प्रस्तावित महामार्गामुळे फार मोठा असंतोष आहे. परिणामी शेतकरी फार मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या गावातील शेतकऱ्यांनीच मला भेटून प्रस्तावित महामार्ग संदर्भातील आपली नाराजी आणि तीव्र विरोध व्यक्त केला आहे. तरी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृपया प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा शासनाने तातडीने पुनर्विचार फेरविचार करावा. अन्यथा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे.