सांगली : शक्तिपीठ महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आलेल्या संवाददूतांसमोर महामार्ग रद्द झालाच पाहिजे, असे सांगत शासकीय अधिकारी, मोनार्क कंपनीच्या प्रतिनिधींची शेतकऱ्यांनी संवादाविना बोळवण केली. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महामार्ग रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन कवलापूरचे भूषण गुरव व बाधित शेतकऱ्यांनी दिले.
शक्तिपीठ महामार्गाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाददूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी (दि. २३) आणि शनिवारी (दि. २४) जिल्ह्यातील १८ गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला आहे. पण आज कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत आपापल्या गावातून अक्षरशः पळवून लावले व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावे लागले.
शक्तिपीठमुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगूनदेखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार हट्ट सोडायला तयार नाही. म्हणून आम्हीही कोणतीही चर्चा करणार नाही. आमची लढाई आमच्या गावात आणि शेतात राहील. त्यासाठी रक्त सांडायचीदेखील तयारी आमची आहे, असेही आंदोलकांनी या वेळी स्पष्ट केले.
या वेळी उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुनील पवार, सुधाकर पाटील आदी शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महामार्ग रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन कवलापूरचे भूषण गुरव व बाधित शेतकऱ्यांनी दिले.