सांगली : वारंवार सूचना देऊनही शहर स्वच्छतेमध्ये कुचराई होत असल्याच्या कारणावरून आयुक्त सत्यम गांधी यांनी दोन मुकादमांना निलंबित केले. तर एका आरोग्य निरीक्षकाच्या दोन वेतनवाढ तहकूब केल्या.आयुक्त गांधी यांनी शहरात फिरून स्वच्छतेबाबतची माहिती घेत पाहणी केली. यावेळी बर्याचशा ठिकाणी उघड्यावर कचरा पडल्याचे निदर्शनास आले. दैनंदिन कचरा उठाव केला जात नसलेचे तसेच वॉर्डामधील दैनंदीन स्वच्छतेचे कामकाज प्रभाविपणे होत नाही ही बाब निदर्शनास आल्याने तसेच वारंवार सूचना देऊनही काही मुकादम यांनी आपल्या कामात सुधारणा करत नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रभाग समिती दोनमधील भाग १९ मधील मुकादम किरण मोरे, भाग ३ मधील मुकादम बाबासाहेब गायकवाड यांच्यावर आयुक्त गांधी यांनी निलंबनाची कारवाई केली. तसेच प्रभाग दोनमधील स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे यांची दोन वेतनवाढ तहकूब करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
नागरिकांच्या तक्रारी कमी होण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रभाविपणे कामकाज करण्याच्या दृष्टीने दर सोमवारी व मंगळवारी उपआयुक्त आढावा घेणार आहेत. नागरी समस्या आणि तक्रारी निवारण करण्यासाठी देखील नागरी संवाद आयोजित करण्यात येत आहे.शहरातील नागरिकांनी कचरा उठाव होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे केल्या होत्या. याची दखल घेउन आयुक्त सत्यम गांधी यांनी काही भागाची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये अनेक भागात कचरा गाडीच येत नसल्याचे आढळून आले तर शहरातील दोन वार्डामध्ये कचरा संकलन होउनही कचरा उचलण्यात आला नसल्याचे दिसून आले होते.
या घटनेची गांभाीर्याने दखल घेत दोन मुकादमावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच एका स्वच्छता निरीक्षकाच्या दोन वेतनवाढी रोखण्याचे आदेश दिले. यापुढे सफाई कर्मचार्यांनी निर्धारित केलेले स्वच्छतेचे काम केले नसल्याचे आढळून आले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त गांधी यांनी दिला आहे.
हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता ही मोहिम महापालिका क्षेत्रात आठवडाभर राबविण्यात येत आहे. १५ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेद्वारे शहरातील प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्वांतत्र्य दिनादिवशी स्वच्छता वीर व स्वयंसेवकांचा सत्कार महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. शहरातील शाळा, संस्था, नागिरकांनी या मोहिमेत सहभागी होउन चौक, घर यांचे सुशोभीकरण केल्याचे छायाचित्र महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.