भाजप पदाधिकार्यांमध्ये महापालिकेत झालेली हाणामारी ही केवळ टक्केवारीतून झाली असून, यामुळे महापालिकेची बेअब्रू झाली आहे. स्वच्छ प्रतिमेचा डांगोरा पिटत असलेल्या भाजपचा हाच चेहरा काय? असे म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले, भाजप पदाधिकार्यांमधील ही हाणामारी चक्क महापालिकेच्या आवारातच घडलेली आहे. त्यांच्याकडे महापालिकेतील एकच महत्त्वाचे पद आहे, तरी एवढी हाणामारी झाली, महापालिकेची संपूर्ण सत्ता लोकांनी ताब्यात दिली. मात्र, अशा पद्धतीच्या राजकारणाला कंटाळून सत्तांतर झाले. संपूर्ण सत्ता ताब्यात असती तर त्यांनी ती विकायलाही मागे पुढे पाहिले नसते. भाजप हा सुसंस्कृत लोकांचा पक्ष आहे, असा डांगोरा पिटणार्या भाजपचे नेतृत्व असे प्रकार खपवून घेत आहे. डावे-उजवे असे कार्यकर्ते जर हाणामारीवर येत असतील आणि तेही केवळ टक्केवारीसाठी तर शहर विकासाची काय अपेक्षा यांच्याकडून धरायची, असा सवाल सामान्यांना पडला आहे.
हेही वाचा – जळगाव जिल्हा दूध संघातील नोकरभरती रद्द; अध्यक्ष मंगेश चव्हाण यांची माहिती, खडसेंना दणका
शहरातील चैत्रबन नाल्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून विशिष्ठ ठेकेदारालाच काम मिळावे यासाठीचा हा पदाधिकार्यांचा अट्टाहास आणि यातून कमाईची संधी साधायची असा हा प्रकार जनतेसमोर उघड झाला आहे. या पक्षाचे नेतृत्व करणारे आ. सुधीर गाडगीळ मात्र या प्रकाराबाबत जाब विचारण्याचे दूरच राहिले त्यांचे मौनच याला पाठिंबा दर्शवत आहे का? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे.