सांगलीतील चौगुले रुग्णालयातील बेकायदा गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. रुपाली चौगुले यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. न्यायालयाने डॉ. रुपाली चौगुले यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील आणखी दोन डॉक्टर अजूनही फरार आहेत.
सांगलीतील जिल्हा रुग्णालयाजवळ चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटल असून या ठिकाणी बेकायदा गर्भपात केला जात असल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आली होती. आरोग्य विभागाच्या पथकाने शनिवारी पोलिसांसह रुग्णालयावर छापा टाकला होता. रुग्णालयात गर्भपातासाठी लागणारी औषधे, संशयास्पद कागदपत्रे आणि मद्याच्या बॉटल जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी गर्भपात प्रतिबंधात्मक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी रविवारी रुपाली चौगुले यांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पोलिसांनी रुपाली चौगुले यांना अटक केली. रुपाली चौगुलेंचे पती व डॉ. विजयकुमार चौगुले आणि डॉ. विजय जमदाडे या दोघांनाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. गर्भपातानंतर भ्रूण परिसरातील शेतात पुरण्यात आले होते, असे वृत्त आहे. याबाबत पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.