सांगली : महायुती म्हणून असो वा स्वतंत्र असो पुढील महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचाच असेल असे आमदार इद्रिस नायकवडी यांनी रविवारी पत्रकार बैठकीत सांगितले. आमदार नायकवडी यांनी सांगितले, आगामी महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढायची की स्वतंत्रपणे लढायची याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. पक्षाने याबाबत अद्याप कोणताही आदेश दिलेला नाही, मात्र, पक्ष जो आदेश देईल त्या पध्दतीने निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे.

महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी आमच्या पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते आहेत. आम्ही महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीही सज्ज आहोत. ज्यावेळी पक्षीय पातळीवर जिल्ह्यातील राजकीय स्थितीची विचारणा केली जाईल त्यावेळी आमच्या तयारीचा आढावा सादर करणार आहे. आमच्या पक्षात येण्यासाठी काही माजी नगरसेवक संपर्कात आहेत, मात्र, पक्ष शिस्तीनुसारच त्यांना वागावे लागणार आहे. योग्य वेळी त्यांची नावे आपण जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सांगलीतील नेत्या श्रीमती जयश्री पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सहभागी होण्यास अनुकूल होत्या, पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशीही याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते, मग भाजपमध्ये त्यांनी का प्रवेश केला असे विचारले असता आ. नायकवडी म्हणाले, या प्रक्रियेमध्ये मी सहभागी नव्हतो.

अथवा मला याबाबत कोणतीही विचारणा झालेली नव्हती, यामुळे याबाबत मी भाष्य करणे अयोग्य ठरेल. मिरजेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्यासह आणखी कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत. यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मेळाव्यास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार अजितराव घोरपडे हे उपस्थित राहणार असल्याचे आ. नायकवडी यांनी यावेळी सांगितले. यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष जमिल बागवान, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, महिला आघाडीच्या प्रमुख राधिका हारगे आदी उपस्थित होते.