रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ जवळ झालेल्या रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे सहायक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरजेपासून चाळीस किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ मंगळवारी रात्री अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसून झालेल्या या अपघातात १४ वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli treat all warakaris injured in road accidents immediately cm shinde msr
First published on: 07-07-2022 at 13:38 IST