सांगली : शरीर संपदेबरोबरच बौद्धिक संपदा निर्माण व्हावी यासाठी शतकापूर्वी स्थापन झालेल्या अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने ग्रामीण भागातील मुलांसाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रारंभ करण्याची परंपरा जोपासली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगली जिल्ह्याच्या धावत्या दौऱ्यात ‘एसबीजीआय’ला भेट देऊन चालू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली. अल्पावधीत संस्थेने अभियांत्रिकी पदवी, पदविका, औषधनिर्माण शास्त्र, शिक्षण शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र आणि परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण देण्याबरोबरच तरुणांनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी संशोधन क्षेत्रात लक्ष्य केंद्रित करावे, याकरिता संस्थेने प्रयत्न करावेत, असे सांगितले.
संस्थेच्यावतीने क्रीडा क्षेत्रातही करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेत असताना देशी खेळाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांची आज गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे संस्थेचे मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे इंद्रिजित घाटे, बाबासाहेब गुंजाटे, माजी नगरसेवक महमंद मणेर, व्यवस्थापकीय संचालिका धनश्री चक्रबोर्ती, संचालक डॉ. ए.सी. भगली, डॉ. संदीप शेळके आदींसह संस्थेचे प्राध्यापक उपस्थित होते.