समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे समर्थन करणारे विधान केले होते. याच विधानामुळे आझमी यांना आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीबाबत बोलताना मला संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया आझमी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी आझमी यांच्या औरंगजेबाबाबतच्या विधानावर बोलताना आम्ही त्यांना आमच्या स्टाईलमध्ये योग्य वेळी उत्तर देऊ, असे विधान केले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >> “काँग्रेसला संंपवण्यासाठी नरेंद्र मोदी- ममता बॅनर्जींनी..,” काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप

योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ

“अबू आझमी औरंगजेबाला दयाळू म्हणतात. त्याचे प्रेम फार उतू आले आहे. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वत:च्या सात भावांची कत्तल केली. सात भावांना मारून तो राजा झाला. त्याच औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना मरेपर्यंत तुरुंगात टाकलं. छत्रपती संभाजी महाराजांना ४० दिवस त्रास देण्यात आला. औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्वचा काढण्यात आली. बोटाची नखं काढण्यात आली. कानामध्ये उकळतं शिसं ओतलं गेलं. ४० व्या दिवशी जीभ कापून मान उडवली. अशा क्रूरकर्म्याला अबू आझमी दयाळू म्हणत असतील, तर मग त्यांना आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देण्याची गरज आहे, असे मला वाटते. ते उत्तर आम्ही योग्य वेळी देऊ,” असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला.

हेही वाचा >> कोट्यवधींची संपत्ती, एका प्रवचनासाठी घेतात हजारो रुपये; वादात सापडेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? 

जीवे मारण्याच्या धमकीनंतर अबू आझमी काय म्हणाले?

जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर अबू आझमी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बातचित केली. यावेळी बोलताना “मी औरंगजेबाचा इतिहास वाचला आहे. औरंगजेबाच्या सैन्यात अनेक सैनिक हिंदू होते. बनारसमध्ये एका पंडिताच्या मुलीवर त्यांचा शिपाई वाईट नजर ठेवायचा. या मुलीने तक्रार केल्यानंतर औरंगजेबाने त्या शिपायाला हत्तीच्या पायी दिलं. मुलगी हिंदू असल्यामुळे तिची जास्त काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे, असे औरंगजेब म्हणाला होता. ज्या ठिकाणी बनारसमध्ये औरंजेबाने नमाज पठण केले होते, तिथे हिंदू बांधवांनी एक मशीद उभारली होती. आजही ती मशीद आहे. औरंगजेबाने एका मंदिराला निधी देण्यासाठी पत्र लिहिले होते. आजही हे पत्र बनारस हिंदू विद्यापीठात आहे,” असे अबू आझमी म्हणाले.

तेव्हाची लढाई धार्मिक नव्हती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला धमकी मिळाल्यानंतर पोलीस तपास करत आहेत. मात्र मी बोलणं बंद करणार नाही. मला मुस्लीम-हिंदू यांच्यात एकी हवी आहे. हा देश हिंदू, मुस्लीम, शीख अशा सर्वांचाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आभार मुस्लीम समाजही मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांसाठी खूप काही केले. त्यांचे अंगरक्षक, वकील मुस्लीमच होते. तेव्हाची लढाई धार्मिक नव्हती. ती लढाई सत्तेसाठी होती. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची प्रतिमा खूप मोठी आहे,” अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली.