scorecardresearch

“संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” संजय गायकवाडांचे अजित पवारांवर टीकास्र; म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी…”

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असं अजित पवार म्हणाले होते.

“संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” संजय गायकवाडांचे अजित पवारांवर टीकास्र; म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी…”
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची भूमिका मांडली होती. यावेळी बोलताना, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असं ते म्हणाले होते. यावरून पुन्हा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडले आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

काय म्हणाले संजय गायकवाड?

विरोधी पक्षनेते अजित पवार दोनच दिवसांपूर्वी महापुरुषांच्या बदनामीवरून विधानसभेत बोलले. त्यांनी विरोधकांवर टीका केली. मात्र, आता छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नाहीत, असं ते म्हणत आहेत. जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं, त्याचं रक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजी राजेंनी केलं. त्यांच्यावर ४० दिवस अत्याचार झाले. त्यांची जीभ कापली, त्यांची मान उडवल्या गेली. धर्मपरिवर्तन करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. मात्र, त्यांनी मरण पत्करलं, पण धर्म बदलला नाही, म्हणूनच त्यांना धर्मवीर म्हटल्या गेलं. त्यांना ही पदवी आपण दिली नाही, तर त्यावेळी मावळ्यांनी दिली. मग इतक्या लोकांनी त्यांना धर्मवीर पदवी दिल्यानंतर ते धर्मवीर नाही, हे म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही संभाजी राजेंचा अवमान करत आहात, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.

हेही वाचा – नितेश राणेंकडून अजित पवारांचा ‘धरणवीर’ म्हणून उल्लेख; संभाजी महाराजांवरील विधानानंतर म्हणाले; “थोडीजरी लाज…”

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, असं विधान अजित पवार यांनी केली होते. “महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा” असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 21:44 IST

संबंधित बातम्या