शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास १०३ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊतांना जामीन मिळाला आहे. तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला अटक होणार हे आधीपासूनच माहीत होतं, असा खुलासा संजय राऊतांनी केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

तुम्हाला अटक होईल, हे तुम्हाला आधीच माहीत होतं का? याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “होय, मला अटक होईल, असं मला १०० टक्के वाटलं होतं. कोणतं तरी प्रकरण निर्माण करून ते मला अटक करतील, असं मला वाटलं होतं. मला काही दिवस किंवा काही महिने तुरुंगात जावं लागेल, याविषयी माझ्या मनात पूर्णपणे खात्री होती. कारण त्यापद्धतीने पडद्यामागे हालचाली आणि बैठका सुरू होत्या. यातील काही बैठका दिल्लीत सुरू होत्या. काही बैठका महाराष्ट्रात सुरू होत्या. तर काही बैठका या देशाबाहेरही सुरू होत्या. माझ्याविरोधात कोणतं तरी प्रकरण उभं केलं जाईल, याची मला खात्री होती.”

हेही वाचा- “…तर मी अटकेचं मनापासून स्वागत करते” जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यामुळे अटकेपूर्वी एक महिना आधीच मी माझ्या कुटुंबाचं समुपदेशन केलं होतं. मला तुरुंगात जावं लागेल. तुम्ही खंबीर राहा. तुम्ही अजिबात डगमगू नका, असा सल्ला मी त्यांना दिला होता. मला तुरुंगात जावं लागेल आणि मी जाईन. तुम्ही कोसळलात तर मी अस्वस्थ होईल. पण माझं संपूर्ण कुटुंब, माझा मित्र परिवार, उद्धव ठाकरे, शरद पवार सर्वजण माझ्या पाठिशी उभे होते. ज्यांना-ज्यांना मी माझा परिवार मानतो, ते सर्वजण माझ्या पाठिशी आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिशी उभे होते” असंही राऊत म्हणाले.