गेल्या अनेक दिवसांपासून ईडी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर ही शक्यता अधिकच बळावली. संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना ईडीनं पाठवलेल्या नोटिशीनंतर तर कारवाई होणार असं ठामपणे सांगितलं जाऊ लागलं. अखेर आज ईडीनं संजय राऊतांशी संबंधित अलिबागमधील ८ जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना भाजपावर प्रतिहल्ला चढवला आहे.

“कुठली मालमत्ता? आम्ही काय…”

२००९ साली हा व्यवहार झाल्यानंतर त्याविषयी कुणी काही विचारणा केली नाही, असं संजय राऊत म्हणाले. “कुठली मालमत्ता? आम्ही काय मालमत्तावाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली”, असं राऊत म्हणाले आहेत. या कारवाईनंतर संजय राऊतांनी “असत्यमेव जयते” असं सूचक ट्वीट देखील केलं आहे.

“हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत”, असं आव्हान यावेळी संजय राऊतांनी भाजपाला दिलं आहे.

संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई, अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त!

“राजकीय सूड कोणत्या थराला पोहोचलाय”

“२००९ची मालमत्ता आहे. एक एकरही पूर्ण जागा नाही. आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत. ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला. राजकीय सूड कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय, ते तुम्ही पाहिलं असेल”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं.

“यातून अजून प्रेरणा मिळते”

दरम्यान, अशा कारवायांमधून अजून प्रेरणा मिळते, असं राऊत म्हणाले आहेत. “आमचं राहतं घर जप्त केलंय. त्यावर भाजपाचे लोक उड्या मारतायत. बघितलं मी.. फटाके वाजवतायत. मराठी माणसाचं हक्काचं राहतं घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते”, असं राऊत म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अशा कारवायांनी झुकणार नाही”

“अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं”, असं राऊत यावेळी म्हणाले.