Sanjay Raut claims 5.5 Crore in Dhule Guest House Room : धुळ्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. विधीमंडळ समितीचे ११ आमदार धुळ्याच्या दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहात ५.५ कोटी रुपयांची रक्कम ठेवल्याची माहिती मिळल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते विश्रामगृहावर धडकले. त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही केली. मात्र, पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे ठाकरेंचे कार्यकर्ते विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ ला कुलूप लावून बाहेर पहारा देत बसले आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

या खोलीत आमदारांना देण्यासाठी आणलेले ५.५ कोटी रुपये ठेवल्याचा दावा शिवसेना (ठाकरे) नेते अनिल गोटे यांनी केला आहे. पाठोपाठ खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.

संजय राऊत यांचा गंभीर आरोप

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की “विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज (२१ मे) धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता, या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास ५.५ रुपये इतकी रक्कम धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात ठेवली आहे. गुलमोहरमधील रूम नंबर १०२ मध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे. त्यांनी सदरच्या (संशयित) रूमला कुलूप लावून बाहेर पहारा ठेवला आहे”.

शिवसेना (ठाकरे) खासदार म्हणाले, “शिवसैनिकांनी विश्रामगृहावर धडक दिल्यानंतर मंत्र्यांच्यां पीएंनी (स्वीय सहाय्यक) तिथून पळ काढला. यासंदर्भात आमच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी धुळ्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिंबधक विभाग व इतर अधिकाऱ्यांसह सर्वांना सूचना दिल्यानंतर चार ते पाच तास उलटून गेले आहेत. तरी अद्याप कोणीही तिकडे फिरकलेलं नाही. प्रशासनाकडून कुठलंही सहकार्य मिळत नाही. विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत! उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच!”