महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी (१० फेब्रुवारी) काँग्रेसला राम राम केला. चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत चव्हाण म्हणाले, “मी दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन”. दरम्यान, ते आजच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ANI ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होईल असा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतले नेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा चव्हाण यांनी शिंदे यांच्याबरोबरच भाजपाशी घरोबा करण्याची योजना आखली होती. अशोक चव्हाण हे गेल्या काही काळापासून पक्ष सोडण्यासाठी, भाजपात जाण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना आता मुहुर्त मिळाला असेल.

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. चव्हाण हे हुशार राजकारणी आणि उत्तम प्रशासक आहेत. हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास आणि पकड होती. त्यांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे.

चव्हाण आणि ठाकरे यांच्या फोनवरून चर्चा

उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यात नुकतीच चर्चा झाली असल्याचंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, काल संध्याकाळीच उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यात चर्चा झाली. त्यांचा उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. दोघांनी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना सांगितलं तुम्ही चुकीचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा >> राष्ट्रवादी फुटण्याआधीच अशोक चव्हाण भाजपात जाणार होते? सात महिन्यांपूर्वीच ‘देवगिरी’वर खलबतं; शरद पवार गटाचा दावा

काँग्रेसला तीन मोठे धक्के!

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसला तीन मोठे धक्के बसले आहेत. आधी मुंबईतले काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवार गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.