Shivsena MLA Disqualification Verdict Updates: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल देणार असून त्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या निर्णयावरून शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. घटनातज्ज्ञांकडूनही संभाव्य निर्णयाबाबत प्रतिक्रिया येत असताना ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. आजचा निर्णय दिल्लीतून झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा निकाल माहिती आहे, असा दावा ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांच्या निकालाबाबत भूमिका मांडली. “दीड वर्षांपासून महाराष्ट्रात बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करतंय. ज्या पद्धतीने घटनाबाह्य सरकार काम करतंय, त्यामुळे महाराष्ट्रात रोज संविधानाची पायमल्ली होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊनही विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेण्यात चालढकल केली. इतर अनेक कामांमध्ये आपला राजकीय रंग दाखवला. या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर आणल्या आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“तुम्ही मॅच फिक्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलात”

“न्यायालयाने त्यांची नियुक्ती लवाद म्हणून केली आहे. ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत. अशा व्यक्तीने तटस्थ राहायला हवं, असं संविधान म्हणतं. पण राहुल नार्वेकर हे या प्रकरणातील आरोपींना स्वत: जाऊन भेटतात. ते याचं कारण देतायत की ते कुणालाही भेटू शकतात. मतदारसंघातल्या कामांसाठी भेटले वगैरे. मी त्यांना सांगू इच्छितो की विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असं सांगतो की एखाद्या कामासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात. मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात. विधानसभा अध्यक्ष कुणाकडे जात नाहीत. तुम्ही का गेलात हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही मॅच फिक्सिंगची तारीख व ते कसं असावं हे ठरवण्यासाठी गेलात. या सर्व गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर घेतल्या जात आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.

Disqualification Verdict : निकाल देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मोठी प्रतिक्रिया

“एवढा आत्मविश्वास कुठून आला?”

“पंतप्रधान १२ तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला? १० तारखेला घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे. मग तुम्हाला हे सरकार टिकवलं जाणार असल्याची खात्री आहे का? याचा अर्थ पंतप्रधानांना निर्णय माहिती आहे. हा निर्णय दिल्लीतून झाला आहे. लवाद फक्त त्यावर शिक्का मारणार आहेत”, असा दावाही संजय राऊतांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. जर आज लवाद निर्णय देणार असतील, तर तुम्ही कोणत्या आत्मविश्वासाने दावोसला शिष्टमंडळ घेऊन जात आहात? घटनेनुसार तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाहीत. पण तरी तुम्ही दावोसला जाताय याचा अर्थ मॅचफिक्सिंग झालंय. पंतप्रधान, मुख्यमंत्री, भाजपा व विधानसभेचे अध्यक्ष यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीने निर्णय दिला जाईल असं आधीच ठरलंय”, असंही संजय राऊत म्हणाले.