राज्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडलं आहे. ५० बंडखोर आमदार गुवाहाटीत असल्याचा दावा एकनाथ शिदें यांनी केला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल चांगलीच झाली आहे. गुवाहाटीमध्ये असलेल्या  आमदारांमध्ये शहाजी पाटील हे देखील आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ अशा प्रकारचं शहाजी पाटील यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शहाजीबापूंच्या या ऑडिओ क्लिपवरुन त्यांना टोला लगावला आहे.

“आसामचे हेमंत बिस्वा शर्मा हे सुद्धा बाहेरुन आले आहेत त्यांच्या जीवावर भाजपा वाढत आहे. त्यांनी आम्हाला तिथे पर्यटनासाठी बोलवले आहे. मी त्यांना निरोप दिला आहे की मला गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहायचे आहे. तिथे १२० खोल्या आहेत आणि या लोकांनी ७५ खोल्या घेतल्या आहेत. २० खोल्या त्यांना मागितल्या आहेत. मला तीन दिवस माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहायचे आहे. त्यांचे उत्तर आलेले नाही,” असे संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”, बंडखोर आमदार शहाजीबापू पाटलांची ऑडिओ क्लिप व्हायरल

“रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मी अनेक वेळा गेलो आहे. हे लोक आसाममध्ये आता गेले आहेत. रेडिसन ब्लू हॉटेल बनत होते तेव्हासुद्धा मी तिथे गेलो होतो. कामाक्षी मंदिराच्या समोरच्याबाजूला हे हॉटेल आहे. त्या हॉटेलमधील लोक मला फोन करत असतात. तिथे आसपास डोंगर झाडी नाही. ते हॉटेल शहरामध्ये आहे. महाराष्ट्रात, सांगोल्याला डोंगर झाडी नाहीये का?,” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

“तिथे कुणी आमदारानं म्हटलंय काय झाडी आहे, काय हॉटेल आहे, काय पाणी आहे. मग महाराष्ट्रात काय स्मशान आहे का? तिथला मुक्काम ३० तारखेपर्यंत वाढवला आहे. का? तुम्ही या ना इथे. तुमचा महाराष्ट्र आहे. तिथेही झाडी आहे, फूल आहे, निसर्ग आहे, दगडं आहेत, पाणी आहे. मग महाराष्ट्रात काय आहे तुमच्या?” असेही संजय राऊत म्हणाले.

VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शहाजीबापू पाटील यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. गुवाहटीत पोहोचलेल्या शहाजीबापू पाटील यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठली. त्यानंतर काळजीपोटी एका कार्यकर्त्यानं शहाजी पाटील यांना फोन लावला आणि शहाजीबापूंनी जे म्हटले सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे.