सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. यावेळी सीमा भागातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच यासंदर्भात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – “कुटुंबाला वेदना झाल्या, मुलगी रडत होती, सुनेला धक्का बसला”, गिरीश महाजनांच्या विधानानंतर एकनाथ खडसे भावूक

“सीमा प्रश्नावर आतापर्यंत अनेक मंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. आज जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे, हे सुद्धा युतीमध्ये असताना या विषयाचे मंत्री होते. चंद्रकांत पाटलांवरही त्यावेळी जबाबदारी होती. हे दोघेही त्यावेळी किती वेळा बेळगावला गेले? मी त्यावेळी एकनाथ शिंदे यांना वारंवार विनंती केली होती की, मला बेळगावला जाऊ द्या, आपणही या. मात्र, तेव्हा कधी बेळगावात गेले नाही. मग आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून असे काय दिवे लावणार आहात?” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“सर्वात आधी तुम्ही बेळगावाला जायला हवं, तिकडच्या मुख्यमंत्र्यांना भेटून तुम्ही सांगायला हवं की, सीमा भागातील मराठी तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत, ते खटले आधी काढून घ्या. पण ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघतात आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करतात, ते सीमा भागातील बांधवांना काय न्याय देणार?” असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “शिवाजीमहाराज जुने, तर गडकरी नवे आदर्श” म्हणणाऱ्या राज्यपालांना मनसेकडून उत्तर, म्हणाले “हिमालयातून आलेल्या….”

“आम्ही सातत्याने सीमाभागात जाऊन तिथल्या समस्या जाऊन घेतो आहे. आमचे शिवसैनिक १ नोव्हेंबरला तिथे जाऊन आले. मात्र, राज्य सरकारचा एकही मंत्री तिथे गेला नाही. सीमा भागातील मराठी नागरिकांवर आज अन्याय होत आहे. ते या देशातच राहात आहेत, ते काही पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत नाहीत. त्यामुळे तो भाग केंद्रशासित करावा”, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.