परभणी – आपणच कसे थोर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या त्यांच्या पुस्तकातून केला आहे. राऊत हे काही देशसेवेसाठी तुरुंगात गेलेले नव्हते तर त्यांनी पत्राचाळीतल्या गरीब लोकांच्या पैशात अफरातफर केली होती. त्यामुळे त्यांचे हे पुस्तक म्हणजे मोठमोठ्या लोकांवर टीका करून केवळ ‘टीआरपी’ मिळविण्याचा उद्योग असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी येथे केली. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) या पक्षाच्या वतीने लाडक्या बहिणीच्या मेळाव्यानिमित्त त्या येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील लाडक्या बहिणी या महायुती सरकारवर समाधानी आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून येत्या काळात महिलांसाठी आरोग्य शिबिरे घेऊन त्यांना औषधोपचार दिले जाणार आहेत. समाधान शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाची विविध कागदपत्रे तसेच दाखले जागेवरच मिळविण्यासाठी मेळावे घेतले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.येथे पार पडलेल्या महिला संवाद कार्यक्रमात गोऱ्हे यांनी संवाद साधला. महायुती सरकारच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, पिंक रिक्षा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना अशा योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी पक्षाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, माजी खासदार सुरेश जाधव, महिला आघाडीच्या गीता सूर्यवंशी, सखुबाई लटपटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.