ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन भाजपावर टीका केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. त्यानंतर संजय राऊत हा भांडुपचा देवानंद आहे अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नितेश राणेंनी टीका केली आहे.
काय म्हटलं आहे नितेश राणेंनी?
औरंगजेबाचा मुद्दा काढला गेला आहे त्या औरंगजेबावर कुणाचं प्रेम आहे महाराष्ट्राला माहित नाही का? ज्यांना संभाजी नगर म्हणता येत नाही त्यांना संजय राऊत कधी जाब विचारणार आहेत? संजय शिरसाट, श्रीकांत शिंदे यांची नावं घेतल्यावर जो थुंकतो त्या संजय राऊतला आव्हान देतोय तू खरा मर्द असशील तर अबू आझमीने औरंगजेबला मी मानतो तो माझा नेता आहे असं वक्तव्य केलं आहे अबू आझमीचं नाव घेतल्यावर थुंकून दाखव असं आव्हान नितेश राणेंनी दिलं आहे. तसंच संजय राऊत यांचा उल्लेख भांडुपचा देवानंद असा केला आहे.




“भांडुपचा देवानंद आज छत्रपती संभाजी नगरमध्ये बोलत होता ते मी ऐकलं. माझा त्याला प्रश्न आहे की ज्या शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीवरचं स्टेटमेंट दिलं की त्यात ते म्हणाले की मी छत्रपती संभाजी नगर शहर नाही म्हणणार तर औरंगाबादच म्हणणार. असं आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले. आता मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे की तुझ्यामध्ये हिंमत आहे का? पवारसाहेबांना सांगणं की बाळासाहेबांपासून ही मागणी होती की औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजी नगर करा. आज छत्रपती संभाजी नगरमध्ये बसून शरद पवारांनाच आव्हान देण्याची हिंमत आहे का?” असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारला.
अबू आझमींवर थुंकणार का?
“संजय राऊतांचा मालक ज्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री झाला त्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी. ते बोलत आहेत औरंगजेब माझा नेता होता आता हिंमत दाखव” असं खुलं आव्हानच नितेश राणेंनी दिलं आहे. एवढंच नाही तर मुंब्र्यात राहणाऱ्या आमदाराला दोन महिने आधीच कसं माहित होतं की महाराष्ट्रात दंगली होणार आहेत? असा प्रश्नही नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांना उद्देशून विचारला आहे. संजय राऊतची इज्जत काय? त्या पॉडकॉस्टवरुन आम्हाला कळलं आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचं पटत नाही त्याचं उदाहरण पॉडकॉस्टवरुन समोर आलं आहे. आदेश बांदेकर अनिल परब यांची मुलाखत घेणार आहे. सेनाभवनचे काही कर्मचारी हे वेळेत पगार मिळत नाही म्हणून शिंदे गटात गेले. तसंच संजय राऊतही एकनाथ शिंदेंना भेटला तर आश्चर्य वाटणार नाही. असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.