शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. एकमेकांवर करण्यात येणाऱ्या आरोप प्रत्यारोपांदरम्यान दोन्ही नेत्यांकडून भाषेचं भान मात्र राखलं जात नाहीये, असं दिसून येत आहे. याबद्दल विरोधी पक्षाकडून टीकाही होत आहे. यावरच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाष्य केलं आहे.

काल किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यावरून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुनावलं आहे. संजय राऊतांनी किरीट सोमय्यांबद्दल वापरलेल्या भाषेबद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या, “टीका करणं, खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरणं, अशी विरोधकांची भूमिका दिसते. पण महाराष्ट्राच्या माणसाला हे पटत नाही, रुजत नाही. राजकीय व्यासपीठावर मतभेद असतात, राजकीय प्रवाह वेगवेगळा असतो. मात्र सत्ताधारी असो वा विरोधक असो, त्यांनी ठराविक पातळी सोडून एकमेकांवर टीका करायला नको असं मला वाटतं.”

हेही वाचा – “भ** शब्दाचा अर्थ संजय राऊतांना कळतो का?, माझ्या बायको आणि आईला….”; किरीट सोमय्या संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह भाषेविरोधात चंद्रकांत पाटील महिला आयोगाकडे तक्रार करणार होते, त्याबद्दल विचारणा केली असता चाकणकर म्हणाल्या, चंद्रकांत पाटलांची तक्रार अद्याप महिला आयोगाकडे आलेली नाही. ही तक्रार आल्यावर आपण त्यावर योग्य ती कारवाई करू.