Sanjay Raut On Pranjal Khewalkar Arrest in Rave Party Row : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीतून ही अटक करण्यता आली आहे. प्रांजल हे शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. या अटकेच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षचे नेते संजय राऊत यांनी या कारवाईनंतर आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.

“माझ्याकडे याबद्दल माहिती नाही. या सरकारच्या काळात कधी कोणाला अटक होईल, कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक होईल… काहीही होऊ शकतं. पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा भाजपा विरोधकांना असा त्रास देण्यासाठीच येथे आहे. मी याबद्दल माहिती घेईन,”असे संजय राऊत म्हणाले.

खडसेंच्या आरोपांची चौकशी केली जात नसल्याचा मुद्दा राऊतांनी यावेळी उपस्थित केला, ते म्हणाले, “खडसेंच्या जावायाला अशाच एका प्रकरणात ईडीने अटक केली होती, त्यामध्ये काही आढळले नाही. दोन दिवसांपासून खडसे हे सरकारच्या विरूद्ध आणि खासकरून गिरीश महाजन यांच्याविरोधात पुराव्यांसह ठामपणे बोलत आहेत. त्यानंतर पुढील २४ तासांत ताबडतोब ही रेव्ह पार्टीची कारवाई झाली. एकनाथ खडसे यांनी जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात,” असेही राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत म्हणाले की, “आख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव्ह पार्टी आहे. आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत. त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर भाजपात येण्याचा दबाव आणला आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरील गुन्हे काढून टाकले. हे एक नवीन तंत्र आहे. एक आमचे सुधाकर बडगुजर होते, त्यांच्या कुटुंबावर मकोकाच्या कारवाया केल्या. भाजपात गेले, रफादफा… सागर पाचपुते, आमचे उपनेते हे नगर जिल्ह्यात काम करत आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. नगर जिल्ह्यातील आमचे शहर प्रमुख किरण काळे यांनी महानगरपालिका आणि तेथील आमदाराविरोधात आंदोलन सुरू केलं, ४०० कोटींचा घोटाळा बाहेर काढला. त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, कोणीतरी एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून पहाटे तीन वाजता अटक केली. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावरती कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याची कारण नाही. कारण अशा प्रकारच्या कारवायांना यापुढे आम्हाला फडणवीसांच्या राज्यात सामोर जावे लागेल.”