Sanjay Raut : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभेची निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना राज्यातील निवडणूक लांबणीवर पडण्याच्या चर्चांबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, निवडणूक आयोगासारखी संविधानिक संस्था जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असेल, तर या देशात लोकशाही आहे कुठं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – “देशाची आणि राज्याची सूत्रे नागपूरमधून चालतात, मात्र…”, खासदार संजय राऊत यांचा टोला

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“लाडकी बहीण योजना मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आहे. यासाठी निवडणूक आयोग जर राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनणार असेल, तर ते संविधानविरोधी आहे. निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था आहे. ही संस्था जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असेल, तर या देशात लोकशाही आहे कुठं? महाराष्ट्रात जर डिसेंबरमध्ये निवडणूक होणार असेल, तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. आता निवडणूक घेतली, तर आपला पराभव होईल, अशी भीती सत्ताधाऱ्यांना आहे, त्यामुळेच त्यांनी हा डाव टाकला आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“राजकीय कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न”

“निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर केली आहे. त्याबरोबर झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर व्हायला हरकत नव्हती. सत्ताधाऱ्यांनी झारखंडची निवडणूक पुढे ढकलली, कारण त्यांना हेमंत सोरेन यांचा पक्ष फोडायचा आहे. तुम्ही बघितला असेल तर चंपई सोरेन हे भाजपात जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातही राजकीय कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदेही खोटं बोलत आहेत”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआयच्या मुलाखतीत बोलताना, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, राज ठाकरेंनी पक्ष सोडावा ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती, असं विधान केलं होतं. याबाबत विचारलं असता, “एकनाथ शिंदे ज्यांच्या नादाला लागले आहेत. ते ढोंगी आणि खोटं बोलणारे लोक आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेही खोटं बोलत आहेत. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंबरोबरच होते. ठाण्याच्या पलीकडे त्यांना कोणी ओळखतही नव्हतं. त्यामुळे २५ वर्षांच्या आधीच्या राजकारणाशी त्यांचा काही संबंध नव्हता. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे फार काही उघडे नव्हते. त्यामुळे त्यांनी याविषयावर बोलणं योग्य नाही. तिथे काय घडलं, त्यांना माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.