ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राजीनाम्यानंतर चव्हाण कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी स्पष्ट काहीच केलं नव्हतं. परंतु, आज त्यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. चव्हाण म्हणाले, आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यावरून प्रतिक्रिया देताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, आमच्यापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाला काय तोंड दाखवणार? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. कारण महाराष्ट्र भाजपाने मोदींच्या शिरपेचात खोटेपणाचा आणखी एक तुरा रोवला आहे. मोदी यांनी नांदेडला जाऊन कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या भूखंड प्रकरणात अशोक चव्हाणांनी कसा घोटाळा केला याची माहिती दिली होती. चव्हाणांनी शहिदांचा कसा अपमान केला हे स्वतः मोदी यांनी नांदेडला येऊन सांगितलं होतं. तेच मोदी आता देशाला काय तोंड दाखवणार?

खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपाने शहिदांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्रात आंदोलन केलं होतं. त्या शहिदांच्या अपमानाचं आता काय झालं? अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन भाजपावाल्यांनी शहिदांचा तो अपमान धुवून काढला का? मला वाटतं सगळ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे. किंवा भाजपाने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा आता बदलली पाहिजे. कारण त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलं आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता आपल्या पक्षात घेऊन शुद्धीकरण मोहीम चालवली आहे. महात्मा गांधी यांचं काँग्रेसचं शुद्धीकरण करण्याचं स्वप्न भाजपाने स्वीकारलं आहे असं दिसतंय.

हे ही वाचा >> “अशोक चव्हाण दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते”, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

अशोक चव्हाणांसह काँग्रेसमधील नेत्यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना संजय राऊत म्हणाले, काँग्रेसबरोबर थेट युती करायचं टाळून भाजपावाले अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहेत. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून ४०० पार उडी मारता येईल असं त्यांना वाटतं. परंतु, मला वाटतं, भाजपा अशा पद्धतीने २०० पारदेखील जाणार नाही. कुठे नेऊन ठेवलीय भाजपा माझी? असा प्रश्न विचारायची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. असंच चालत राहिलं तर मोदींना देशात तोंड लपवून फिरावं लागेल.