अमरावतीच्या खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत मोठा गदारोळ झाला होता. यामुळे राणा दाम्पत्याला जेलवारी सुद्धा करावी लागली. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणारे हेच दाम्पत्य शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह लेह-लडाख दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसोबत गप्पा मारतानाही दिसून आलं. यावरुन आता राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत बोलताना राणा दाम्पत्य आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात. मी म्हटलं जर मशिदीवर बांग जोरात लागली तर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावा. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? त्यांना अटक केली. मधु इथे आणि चंद्र तिथे असे अटक झाले. नंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसेनेकडून त्यांना वाट्टेल ते बोललं गेलं. एवढा राडा झाल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही? ज्यांच्यामुळे हे सगळं घडल, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये जेवताय? हे सगळे ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व पकपकपक बोलण्यासाठीच आहे. यांना दुसऱ्या गोष्टी नको आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे केंद्र सरकारला विचारा कारण ती त्यांची समिती होती. ती खाजगी टूर नव्हती. केद्रीय बैठकीसाठी आम्ही गेलो होतो. एवढंही यांना समजत नसेल तर या लोकांनी राजकारणात राहू नये,” असे संजय राऊत म्हणाले.

“मातोश्री हे हिंदुंचे श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचणे राजद्रोह होऊ शकत नाही. पण तरीही आमच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला. त्यावर तुम्ही बोलला नाहीत. २०१८ मध्ये शरद पवारांचा तुम्ही सन्मान केला होतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. एखादा महाराष्ट्राचा नेता तुम्हाला लेह  लडाखमध्ये येऊन भेटतो तर हा काही गुन्हा नाही. यामध्ये तुम्हाला मिरची लागण्याचे कारणही नाही. कारण तुम्ही केले ते सत्य आणि आम्ही केले ते असत्य असं तुम्ही समजत असाल. पण महाराष्ट्राची जनता सगळे समजते,” असे रवी राणा म्हणाले.

दरम्यान, संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य सध्या लडाख दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एकूण ३० खासदारांचा समावेश होता. त्यात खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश होता. खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेण्याची परवानगी आहे आणि त्यामुळेच नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यात सुद्धा उपस्थित होते. यावेळी एकमेकांवर टीका करणारे संजय राऊत आणि नवनीत राणा हे एकत्र दिसून आले. आमदार रवी राणा आणि संजय राऊत हे एकमेकांसोबत जेवण करतानाही दिसून आलं आहे. त्यासंदर्भातील फोटोजही व्हायरल झाले होते.